फोडाफोडीचे राजकारण सिद्ध झाल्यास राजीनामा देईन : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:48 PM2019-06-06T19:48:26+5:302019-06-06T19:49:39+5:30
मी कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही व करणारही नाही. शिवसेना-भाजप युती अभेद्य राहिली पाहिजे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मी आपलेच मानतो. कोणीही बुद्धिभेद करण्याचे काम करू नये, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजपचा एक जरी कार्यकर्ता फोडला असा आरोप सिद्ध झाल्यास पक्षाचा राजीनामा देईन, असे आव्हान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले.
सावंतवाडी : मी कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही व करणारही नाही. शिवसेना-भाजप युती अभेद्य राहिली पाहिजे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मी आपलेच मानतो. कोणीही बुद्धिभेद करण्याचे काम करू नये, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजपचा एक जरी कार्यकर्ता फोडला असा आरोप सिद्ध झाल्यास पक्षाचा राजीनामा देईन, असे आव्हान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले.
मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत बुधवारी विविध विषयांवर आपली भूमिका आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. ते म्हणाले, मी मोठ्या प्रमाणात निधी आणत आहे. त्यांची कामेही सुरू आहेत. मात्र, काही जण श्रेयाचे राजकारण करीत आहेत. गृहखाते माझ्याकडे असताना काहीजण येथील मशिदीच्या वाढीव बांधकामाचे काम आपणच केल्याचे श्रेय घेत आहेत. हे योग्य नाही. जिल्ह्यात कधी नाही एवढा निधी आला आहे.
पाणीटंचाईची कामे राहिली असतील, पण पुढील वर्षात एकाही गावात पाणीटंचाई राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले. आमदार नीतेश राणे यांनी दिलेली गस्तीनौका स्वीकारायची की नाही ते प्रशासन ठरवेल; पण कोकणात पोलीस विभागाला अद्ययावत अशा गस्तीनौका मिळणार आहेत. माझ्यावर अनेक वेळा टीका होत असते. यातून मी शिकण्याचा प्रयत्न करतो.
शिवसेना-भाजपची युती अभेद्य राहणार
निवडणुकीत आम्ही छोटा भाऊ-मोठा भाऊ असे जरी म्हटले असले, तरी शिवसेना-भाजपची युती अभेद्य राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी निवडणुकीनंतरच्या पहिल्या भाषणात शिवसेनाप्रमुखांचा उल्लेख केला. त्यामुळे खालच्या पातळीवरही ही युती टिकली पाहिजे, असे मंत्री केसरकर म्हणाले.
मी कधीही भाजप कार्यकर्त्यांना फोडण्याचे काम केले नाही. उलट काही भाजपचे सरपंच शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक होते. त्यांना युतीचा धर्म म्हणून घेतले नाही. असे असताना माझ्या विरोधात बुद्धिभेद का, असा सवाल करीत जर मी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला फोडल्याचे सिध्द झाल्यास पक्षाचा राजीनामा देईन, असेही आव्हान भाजपला दिले आहे.
आंबोलीत पर्यटन पोलीस ठाणे
आंबोलीला स्वंतत्र पर्यटन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. सिंधुदुर्ग पोलिसांकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी लवकरच दिली जाणार आहे, अशी माहिती यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी दिली.