जमिनी लाटून हॉटेल्स उभारली नाहीत, दीपक केसरकर यांचा नारायण राणे यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:26 AM2019-12-24T11:26:33+5:302019-12-24T11:28:01+5:30

सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनस होऊ नये यासाठी विरोध करणारे भाजप उमेदवार संजू परब यांना सावंतवाडीतील जनता कदापी स्वीकारणार नाही. त्यांना येथील जनतेने ओळखले आहे, अशी जोरदार टीका माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली.

Deepak Kesarkar's Narayan Rane topped with hotels | जमिनी लाटून हॉटेल्स उभारली नाहीत, दीपक केसरकर यांचा नारायण राणे यांना टोला

सावंतवाडी येथे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विकास सावंत, रुपेश राऊळ, संजय पडते, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देजमिनी लाटून हॉटेल्स उभारली नाहीत, दीपक केसरकर यांचा नारायण राणे यांना टोला परब यांनीच सावंतवाडी टर्मिनसला विरोध केला होता

सावंतवाडी : सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनस होऊ नये यासाठी विरोध करणारे भाजप उमेदवार संजू परब यांना सावंतवाडीतील जनता कदापी स्वीकारणार नाही. त्यांना येथील जनतेने ओळखले आहे, अशी जोरदार टीका माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली.

मी माझ्या मंत्रिपदाचा उपयोग जमिनी लाटून पेट्रोल पंप, हॉटेल उभारण्यासाठी केला नाही, असा टोलाही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांनी हाणला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी विकास सावंत, संजय पडते, नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबू कुडतरकर, रुपेश राऊळ, वसंत केसरकर, काशिनाथ दुभाषी, पुंडलिक दळवी, बाबुराव धुरी, रवींद्र म्हापसेकर, सिध्देश परब, अमेय तेंडोलकर, उदय भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री केसरकर म्हणाले, सावंतवाडी शहराच्या विकासासाठी येथील नागरिकांनी मला गेली अनेक वर्षे निवडून दिले. माझ्यावर त्यांचा विश्वास आहे. परंतु आता या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध दीपक केसरकर असा संघर्ष रंगविला गेला, ही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी संजू परब यांना पाहिले तर नारायण राणेच दिसतात. त्यामुळे काही झाले तरी येथील जनता त्यांना स्वीकारणार नाही.

नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या परब यांनी यापूर्वी सावंतवाडीत टर्मिनस होऊ नये, यासाठी प्रयत्न केला होता. त्यामुळे ते तब्बल पाच वर्षे प्रलंबित राहिले हे सावंतवाडीची जनता अद्याप विसरली नाही. परब यांनी निवडणुकीच्या आधी दोन महिने मडुरा या गावी असलेले आपले नाव सावंतवाडीच्या यादीत घातले आणि आता ते निवडणूक लढवित आहेत. मात्र, त्यांना येथील जनता स्वीकारणार नाही. कणकवलीचा दहशतवाद याठिकाणी येता कामा नये, अशी येथील नागरिकांची धारणा आहे.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी माघार घ्यावी. त्यांचे पुनर्वसन आम्ही नक्कीच करू. महाआघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर आहेत. त्यांच्या पाठिशी साळगावकर यांनी रहावे. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक लागली आहे. त्यामुळे त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. त्यांचे माझे कौटुंबिक संबंध आजही आहेत आणि ते भविष्यातही राहतील, असे केसरकर म्हणाले.

जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे नारायण राणे यांचे स्वप्न अपुरे राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सत्ता स्थापन करताना आपल्याकडे १४० आमदार आहेत, असा दावा करणारे नारायण राणे नंतर मात्र मागे पडले. त्यांचे गणित कदाचित कच्चे असावे, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.

त्या प्रवृत्तीला येथील जनता माफ करणार नाही

दीपक केसरकर पुढे म्हणाले, मी निष्क्रिय आहे, असा राणे यांनी केलेला आरोप मला मान्य आहे. कारण मी माझ्या मंत्रिपदाचा उपयोग लोकांची बंद थिएटर्स खरेदी करण्यासाठी केला नाही. लोकांच्या जमिनी घेतल्या नाहीत की त्या ठिकाणी पेट्रोल पंप, हॉटेल व्यवसाय सुरू केला नाही. त्यामुळे राणेंच्या त्या विधानाबद्दल मला वाईट वाटत नाही. पण काही झाले तरी नारायण राणे यांच्या प्रवृत्तीला येथील जनता माफ करणार नाही.

सावंतवाडी शहर आपल्याकडे यावे यासाठी नारायण राणे गेली २३ वर्षे हट्ट करीत आहेत. लहान मुले जसे मला चांदोबा पाहिजे, असा हट्ट धरतात, तसे राणे अनेक वर्षांपासून सावंतवाडीवर डोळा ठेवून आहेत. मात्र, येथील जनता त्यांना सावंतवाडी देणार नाही, असाही टोलाही केसरकर यांनी लगावला.


 

Web Title: Deepak Kesarkar's Narayan Rane topped with hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.