दीप्ती जिकमडेचा मृतदेह आढळला, भडगाव नदीपात्रातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:13 PM2019-07-29T13:13:51+5:302019-07-29T13:22:54+5:30
भडगाव नदीपात्रात दुचाकी पडून झालेल्या अपघातानंतर गेले चार दिवस बेपत्ता असलेल्या दीप्ती जिकमडे (२८, रा. अणाव-दाभाचीवाडी) हिचा मृतदेह अखेर पाचव्या दिवशी कडावल येथील नदीपात्रात आढळून आला.
कुडाळ : भडगाव नदीपात्रात दुचाकी पडून झालेल्या अपघातानंतर गेले चार दिवस बेपत्ता असलेल्या दीप्ती जिकमडे (२८, रा. अणाव-दाभाचीवाडी) हिचा मृतदेह अखेर पाचव्या दिवशी कडावल येथील नदीपात्रात आढळून आला.
मंगळवारी रात्री अणाव-दाभाचीवाडी येथील हरी व त्यांची पत्नी दीप्ती हे दोघे जांभवडे येथील त्यांच्या पाहुण्यांकडून पुन्हा अणाव येथे दुचाकीने येत होते. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भडगाव नदी पुलावरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीसमोर साप आला. सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन जिकमडे दाम्पत्य दुचाकीसह नदीपात्रात कोसळले. हरी जिकमडे यांनी पोहत किनारा गाठला, मात्र त्यांची पत्नी दीप्तीचा थांगपत्ता लागला नव्हता.
गेले चार दिवस आपत्ती व्यवस्थापनाकडून शोधकार्य सुरू होते. या दरम्यान तिसऱ्या दिवशी बुधवारी दीप्तीची साडी आणि पर्स भडगाव नदीपात्रात सापडली होती. चौथ्या दिवशीही दीप्तीचा काहीच थांगपत्ता न लागल्याने पाचव्या दिवशी शनिवारी पुणे येथील एनडीआरएफचे पथक व बाबल आल्मेडा यांची टिम नदीपात्रात शोध घेत होते.
शोध मोहीम सुरू असतानाच सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कडावल चर्चजवळील नदीपात्रात दीप्तीचा मृतदेह बाबल आल्मेडा यांच्या टिमला सापडल्यानंतर हे शोध कार्य थांबविण्यात आले. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पतीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
दीप्ती हिचे माहेर कुडाळ येथे असून, अणाव येथील हरी जिकमडे यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. तिच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हयगयीने दुचाकी चालवून दीप्ती हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा पती हरी जिकमडे याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. तशी माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.