लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाणार नाही ! -- नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 05:12 PM2019-05-24T17:12:26+5:302019-05-24T17:35:02+5:30
लोकसभा निवडणुक निकालाच्या रूपाने मिळालेला जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. मात्र या पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. कणकवलीत आम्हाला १० हजार ७३१ चे मताधिक्य मिळाले आहे.
कणकवली : लोकसभा निवडणुक निकालाच्या रूपाने मिळालेला जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. मात्र या पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. कणकवलीत आम्हाला १० हजार ७३१ चे मताधिक्य मिळाले आहे. तर कुडाळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला फारच कमी मताधिक्य आहे. तशीच परिस्थिती रत्नागिरीतील काही मतदारसंघात आहे.त्यामुळे विधानसभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काही आमदार निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केला.
कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला अडीच लाख मते मिळाली आहेत. कोणाशी युती अथवा आघाडी न करता मिळालेली ही मते म्हणजे एकप्रकारे मतदारांची पोचपावतीच आहे.आम्ही कुणाशी युती केली नव्हती की कुणाच्या कुबड्या घेतल्या नव्हत्या.निव्वळ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचीच ही मते आहेत.त्यामुळे विजयी कोणी झाले असतील तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्यातील मतदारांच्या मनातील खासदार नीलेश राणे हेच आहेत . हे स्पष्ट होते. कुठल्याही मतदाराला विचारले तर निकाल धक्कादायक आहे.असेच उत्तर येते. कार्यकर्त्यानी निवडणुकीत जी मेहनत घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आताचा निकाल पाहता विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची खरी ताकद दिसेल.
आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वीच्याच जिद्दीने, उमेदीने व उत्साहाने जनतेची विकास कामे करण्यास तत्पर राहू. नवीन पक्ष, नवीन झेंडा, नवीन चिन्ह तसेच मोदी लाट असताना व विरोधकांची युती असताना आम्हाला जी मते मिळाली त्यांची संख्या बघता तो आमचा एकप्रकारे विजयच आहे.
लोकसभा निवडणुकी अगोदर शिवसेना आणि भाजप पक्षात कुरबुरी होत्या. नाराजीचे नाट्य होते. एकमेकांना त्यांनी जाहीर विरोधही केला होता. परंतु , प्रत्यक्षात मात्र नेमकी उलट स्थिती होती. शिवसेना - भाजप युतीचे कार्यकर्ते एकमेकांशी प्रामाणिकपणे वागले. त्यामुळे शिवसेनेचे विनायक राऊत यांना सावंतवाडीत 29 हजाराचे मताधिक्य मिळू शकले. आता यापुढेही शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी अशीच मैत्री कायम ठेवून एकमेकांशी प्रामाणिक राहावे. दुष्मनी ठेवू नये. असा टोलाही नितेश राणे यांनी यावेळी लगावला.
आम्ही लढायला तयार !
येत्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात सर्वाधिक चुरस असणार आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्तेही निवडणूक रिंगणात उभे राहण्यासाठीची तयारी करीत आहेत. परंतु, काही असले तरी आमच्या विरोधात मात्र कणकवलीत सारे विरोधक एकवटून काम करतील. पण तशाही स्थितीत आमची लढायची तयारी आहे . असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.