जेटीवरील अनधिकृत बांधकाम हटवा
By Admin | Published: January 22, 2015 11:18 PM2015-01-22T23:18:52+5:302015-01-23T00:45:28+5:30
आरोंदा येथील प्रश्न : राऊत यांची मागणी
कुडाळ : येत्या २३ जानेवारी माघी गणेश जयंती असल्याने आरोंदा येथील गणेश विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या परंपरागत रस्त्यावर जेटीचे काम करणाऱ्या कंपनीने अनधिकृतपणे केलेले बांधकाम तत्काळ हटवून रस्ता मोकळा करावा, असे पत्र खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांना दिले आहे. या पत्रात खासदार राऊत यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील किरणपाणी खाडीवर परंपरागत माल वाहतूक करणारी जुनी जेटी होती. आरोंदावासीय स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या याच जेटीवर गणपती विसर्जनाचे धार्मिक कार्य करीत होते. परंतु अलिकडच्या काही महिन्यांपूर्वी आरोंदा जेटीचे नियमबाह्य काम करणारे मे. व्हाईट आॅर्गीड इस्टेट, चेंबूर-मुंबई या कंपनीने गणेश विसर्जनाच्या घाटावर अनधिकृत बांधकाम केले, इतकेच नव्हे तर, गणेश विसर्जन घाटाकडे जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ताही भिंत घालून बंद केला आहे. कंपनीने केलेले हे बांधकाम नियमबाह्य व अनधिकृत असल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी, खारभूमी विकास उपविभागीय वेंगुर्ले यांनी कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग खारभूमी विकास विभाग, सिंधुदुर्गनगरी यांना पत्र पाठविले असून, ते बांधकाम काढून टाकण्याचे आदेशही दिले होते. परंतु अद्यापही या बांधकामावर कोणतीही कारवाई केलेली नाही, असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. आरोंदा येथे २३ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी करण्यात येते. यादिवशी परंपरेनुसार गणेशाचे पूजन करून दुसऱ्या दिवशी मूर्तीचे विसर्जन केले जाते. परंतु येथील विसर्जन घाट बंद केल्याने हिंंदुधर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष द्यावे व संबंधितांची बैठक घेऊन आरोंदा जेटीवर झालेले अनधिकृत बांधकाम त्वरित तोडून टाकावे व विसर्जन घाट मोकळा करून द्यावा. अन्यथा भविष्यात फार मोठा धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. याची जाणीव ठेवून योग्य ती पावले उचलावीत, असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)