सिंधुदुर्ग : डाटा आॅपरेटरांचे मानधन खात्यात जमा करण्याची मागणी : वैभव नाईक यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 03:08 PM2018-10-10T15:08:34+5:302018-10-10T15:18:21+5:30
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील डाटा आॅपरेटरांचे रखडलेले मानधन व ग्रामपंचायत पथदीप बिलांच्या प्रश्नाबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन लक्ष वेधले.
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील डाटा आॅपरेटरांचे रखडलेले मानधन व ग्रामपंचायत पथदीप बिलांच्या प्रश्नाबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन लक्ष वेधले.
डाटा आॅपरेटरांचे मानधन ग्रामविकास विभागाकडून थेट डाटा आॅपरेटरांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली असून, यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री भुसे यांनी दिल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली.
ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पांतर्गत डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन ग्रामपंचायत सीएससी एसपीव्ही या कंपनीस वर्ग करते. मात्र, ते मानधन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होते.
ही बाब आमदार वैभव नाईक यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी मानधन थेट डाटा आॅपरेटरांच्या खात्यात जमा करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतींच्या पथदीप बिलांचा प्रश्नही आमदार नाईक यांनी उपस्थित केला. ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे बिल न भरल्याने महावितरण विभागाकडून ग्रामपंचायतींना नोटिसा आल्या आहेत.
ग्रामपंचायतींचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना हे बिल भरणे शक्य होत नाही. त्यामुळे हे बिल ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात यावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. यावरही मंत्री भुसे यांनी सकारात्मक चर्चा करून त्यासंदर्भात आदेश काढण्यात येतील तसेच ग्रामपंचायतींचे पथदीप बंद होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल, असे सांगितले.