अभियंत्यावर कारवाईची मागणी
By admin | Published: May 11, 2015 10:04 PM2015-05-11T22:04:59+5:302015-05-11T23:26:14+5:30
उपोषणाचा इशारा : कोयना धरण व्यवस्थापनचे अभियंता
कोयनानगर : ‘कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता धरणे यांची औरंगाबाद याठिकाणी बदली झालेली असताना त्यांना कार्यमुक्त करण्यास होत असलेल्या टाळाटाळीमुळे कोयना विभागामध्ये प्रचंड असंतोष उसळला आहे. त्यांना येत्या आठ दिवसांत कार्यमुक्त न केल्यास निवडक कार्यकर्त्यांसह कोयना धरण व्यवस्थापन कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे,’ असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी दिला. संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोयना प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यरेषा आहे; परंतु या प्रकल्पाच्या उभारणीत कोयना प्रकल्पग्रस्तांचा सिंहाचा वाटा आहे. याचा अलीकडच्या अधिकाऱ्यांना विसर पडला आहे. आजपर्यंत कोयना प्रकल्पाचे अधिकारी आणि स्थानिक जनता यांच्यामध्ये खेळीमेळीचे वातावरण होते. मग धरणे आल्यानंतर हे वातावरण अचानक का बिघडले, या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात. मग त्याचे वैभव वाढविण्याऐवजी कार्यालये बंद करून कोयना प्रकल्पाचे वैभव कमी करण्याचा प्रयत्न का होतोय, याचीही उत्तरे समोर आली पाहिजेत. धरणे यांनी चार वर्षांच्या कालावधीत कार्यकारी अभियंता म्हणून नव्हे तर कारकुनाचे काम यशस्वी केले आहे. वादग्रस्त निर्णय घेऊन कोयनानगरमधील जनतेचा रोष पत्करण्यामध्ये धरणे यांनी धन्यता मांडली. त्यांच्या हो मध्ये हो मिळवून वरिष्ठांनी त्याला खतपाणी घालण्याचे काम केले. धरणे यांचा कोयनानगरमधील तीन वर्षांचा कालावधी संपूर्ण वर्ष झाले तरीही त्यांच्या जागेवर कार्यकारी अभियंता म्हणून हजर होण्यास् ा जलसंपदा विभागाकडे अधिकारी नसतील तर जलसंपदा विभागाचे दुर्दैव म्हणावे लागेल. (वार्ताहर) कार्यकारी अभियंता धरणे यांना येत्या आठ दिवसांमध्ये कार्यमुक्त न केल्यास स्वत: जलसंपदामंत्री यांना भेटून धरणे यांच्या चौकशीची मागणी करणार आहे. ज्या कोयना प्रकल्पग्रस्तांनी आपले सर्वस्व कोयना प्रकल्पाला दान केले. त्या कोयना प्रकल्पग्रस्तांना एकामागून एक नोटिसा काढून त्यांचे मानसिक संतुलन बिघडवण्याचे काम करणाऱ्या धरणे यांना किंमत मोजवीच लागेल. - नंदकुमार सुर्वे