अंजनवेलचा गोपाळगड मुक्त करण्याची मागणी
By admin | Published: February 19, 2015 10:51 PM2015-02-19T22:51:29+5:302015-02-19T23:38:54+5:30
तहसीलदारांकडे मागणी : शिवतेज फाऊंडेशनची शिवजयंतीदिनी मोटारसायकल रॅली
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला राज्यसंरक्षित स्मारक जाहीर करुन काही वर्षे झाली आहेत. हा किल्ला खाजगी मालकीच्या वादात अडकल्याने पुढील कार्यवाही सरकार दरबारी थांबली असून, हा गड खाजगी मालकीमुक्त होऊन सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी शिवतेज फाऊंडेशनच्यावतीने रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे देण्यात आले.दोन वर्षापूर्वी अॅड. संकेत साळवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवतेज फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. गेली दोन वर्षे सामाजिक व ऐतिहासिक प्रबोधनात्मक उपक्रम घेत असताना, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला खाजगी मालकीतून मुक्त व्हावा यासाठी सातत्यसाने शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. यासाठी शिवप्रेमींची एक मोठी फळी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली असून, दुसऱ्या वर्धापनदिनी १८ हजार सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे आज देण्यात आले. याबाबत सर्वांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने शृंगारतळी ते गुहागर तहसील कार्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा किल्ला शासनाच्या ताब्यात येण्यासाठी अनेक अयशस्वी प्रयत्न करण्यात आले. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे आजही हा किल्ला पारतंत्र्यात आहे.
जो किल्ला शिवरायांनी सागरी सुरक्षेसाठी बांधला होता, त्या गोपाळगडची तटबंदी जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न चालू आहे. भविष्यात या किल्ल्याचा उपयोग खाजगी मालकाकडून हॉटेल व्यवसाय व व्यापाराकरिता होऊ शकेल, याची भीती निर्माण झाली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला त्वरित शासनाने ताब्यात घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. संकेत साळवी, राजेंद्र आरेकर निलेश गोयथळे, मनोज बारटक्के, बाळासाहेब ढेरे, अलंकार विखारे आदींसह तालुक्यात ५०० हून अधिक शिवप्रेमी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यासाठी परिसरातील शिवभक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गोपाळगड खाजगी मालकीतून मुक्त व्हावा, यासाठी हे पहिले मोठे पाऊल सर्व शिवप्रेमींच्या पाठिंब्यावर शिवतेज फाऊंडेशनने उचलले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनानंतर याबाबत सकारात्मक हालचाली होतील अशा अपेक्षा ठेवून पुढील टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय तडीस नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. संकेत साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.