भानू तायल यांच्या हकालपट्टीची मागणी
By admin | Published: December 14, 2014 09:21 PM2014-12-14T21:21:57+5:302014-12-14T23:55:12+5:30
हुसेन दलवाई : कोकण रेल्वेच्या अधोगतीची जबाबदारी तायल यांचीच
चिपळूण : कोकण रेल्वेच्या होणाऱ्या अधोगतीस व्यवस्थापकीय संचालक भानुप्रसाद तायल हेच जबाबदार आहेत. त्यांना हटवल्याशिवाय कोकण रेल्वेला चांगले दिवस येणार नाहीत. त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी खासदार हुसेन दलवाई यांनी केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गेल्या वर्षभरात कोकण रेल्वे मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. होणारे अपघात लक्षात घेऊन त्याबाबत कोणतेच ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा वेगही मंदावला आहे. तासी ७५ किलोमीटरपेक्षा पुढे या गाड्या धावत नाहीत. गाड्यांच्या वेळाही अनियमित होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा नेहमीच गोंधळ उडत आहे. कोकण रेल्वेची पीछेहाट होत आहे. नवीन प्रकल्पही रेंगाळले आहेत. या सर्वाला व्यवस्थापकीय संचालक तायल हेच जबाबदार आहेत, असा आरोपही दलवाई यांनी केला आहे.
कोकण रेल्वे आणि प्रवाशांच्या समस्यांबाबत आपण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनीही याबाबत लक्ष देऊ, असे आश्वासन दिले आहे. कोकणातील प्रवाशांनाही योग्य न्याय मिळत नाही. शेकडो प्रवाशांना गाडीत बसायलाही जागा मिळत नाही.
वारंवार प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक करावा लागतो. सुविधा पुरविण्यात कोकण रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे, असा आरोपही दलवाई यांनी केला. त्यामुळे कोकणातून आणखी एखादी लोकल गाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)