नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी
By Admin | Published: October 23, 2015 09:32 PM2015-10-23T21:32:37+5:302015-10-24T00:55:41+5:30
चिपळूण : लियाकत शहा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
अडरे : पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्षाशी फारकत घेऊन राजीनामा न देता स्वतंत्र गट स्थापणाऱ्या राष्ट्रवादीच्या ८ नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सन २०११मध्ये झालेल्या चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २४ पैकी १२ राष्ट्रवादी, ३ काँग्रेस, ४ शिवसेना, ५ शहर विकास आघाडी असे सदस्य निवडून आले. राष्ट्रवादी १२ व काँग्रेस ३ अशी १५ सदस्य संख्या झाल्याने नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सत्ता स्थापन झाली. सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांच्या निवडीकरिता राष्ट्रवादीच्याच १२ नगरसेवकांपैकी निर्मला चिंगळे, तेजश्री सकपाळ, राजेश केळस्कर, शिल्पा सप्रे-भारमल, आदिती देशपांडे, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, शहाबुद्दिन सुर्वे व रुक्सार अलवी या ८ जणांनी स्वतंत्रपणे चिपळूण आघाडी या नावाने गट स्थापन केला. या करिता वरिल ८ जणांना कागदोपत्री पक्षातून फारकत घेतल्याचे नमूद करावे लागले तर राष्ट्रवादीचे उर्वरित ४ व काँग्रेसचे ३ मिळून ७ जणांचा राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडी नावाने गट स्थापण्यात आला. पक्षातून फारकत घेऊन ४ वर्षे होवूनही ८ जणांच्या गटाने आपल्या गटाला राष्ट्रवादी वगळता अन्य कोणत्यातरी पक्षात विलीन करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीनंतर ८ जणांचा गट राष्ट्रवादीचाच म्हणून अजूनही कार्यरत आहे. यावर राष्ट्रवादीतून अथवा विरोधी गटातून कोणतीही विचारणा होत नाही. याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली असून, रत्नागिरी नगर परिषदेतील ४ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या पार्श्वभूमीवर व तांत्रिक कारणास्तव राष्ट्रवादीतील ८ नगरसेवक अपात्र ठरु शकतात, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे. याबाबत शाह यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकारी, नेते यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. नगर पालिकेच्या सत्तेतील सहकारी असूनही आम्हाला मासिक बैठकीकरिताही व्हीप बजावून आमची गळचेपी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई नसल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)
स्वतंत्र गट : राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांबाबत आक्षेप
राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी वेगळा गट स्थापन केला. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षातून बाहेर पडणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडणुकीनंतर हा गट राष्ट्रवादीचाच गट म्हणून कार्यरत आहे.
चार वर्षानंतरही कोणतीच कारवाई नाही.
व्हीप बजावूनही गळचेपी धोरण.
कोणत्याही पक्षात विलीन नाही.
वरिष्ठ स्तरावरही दखल.
पक्षाचे नगरसेवक
पक्षातून फारकत घेऊन ४ वर्षे होऊनही आठ जणांच्या गटाने आपल्या गटाला राष्ट्रवादीवगळता अन्य कोणत्या तरी पक्षात विलीन करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता हे नगरसेवक राष्ट्रवादीचेच म्हणून कार्यरत आहेत. हे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.