रशियामध्ये हापूसची मागणी वाढतीच
By Admin | Published: May 19, 2017 11:23 PM2017-05-19T23:23:07+5:302017-05-19T23:23:07+5:30
रशियामध्ये हापूसची मागणी वाढतीच
मेहरुन नाकाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा आंबा आतापर्यंत कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ४ हजार ७७३ किलो आंबा निर्यात करण्यात आला होता. शुक्रवारी आणखी १ हजार १२८ मेट्रीक टन आंबा निर्यात झाल्याने आतापर्यंत झालेल्या निर्यातीचा आकडा ५ हजार ९०१ मेट्रीक टन झाला आहे. कुवेत, रशियाकडून हापूसची मागणी वाढतच असून, नियमित पाऊस सुरू होईपर्यत आंबा निर्यात सुरू राहणार आहे.
मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०४३ आंबा बागांची नोंदणी करण्यात आली आहे. यावर्षी थेट रशिया व कुवेतसाठी हापूसला मागणी आल्याने आंबा निर्यात करण्यात आला आहे. अनिकेत हर्षे (नेवरे, ता. रत्नागिरी), डॉ. खलिफे (राजापूर) आणि सचिन लांजेकर (रत्नागिरी) यांच्या बागेतील आंबा कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला आहे. रशियामध्ये आंबा निर्यातीसाठी वजनाची अट निश्चित करण्यात आली आहे. २७० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे फळ निर्यातीसाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे किलोला चार फळे बसत आहेत. निर्यातीपूर्वी केवळ फायटो सॅनिटरी प्रक्रिया करण्यात येत आहे.
आतापर्यंत रत्नागिरीतून प्रथमच कुवेत व रशियामध्ये आंबा निर्यात झाला आहे. सुरळीत निर्यात प्रक्रिया व उच्च दर यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्यातरी बाष्पजल प्रक्रिया निर्यातीच्या आंब्यावर सुरू आहे. ही सुविधा मुंबईत उपलब्ध आहे. रत्नागिरी व जामसंडे (सिंधुदुर्ग) येथे उष्णजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात आली आहेत. परदेशात आंबा निर्यात करण्यासाठी व्यापारी रत्नागिरीत येत असले तरी त्यांना आंबा खरेदी, बाष्पजल प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे त्यांची संख्या घटली आहे.
व्यापाऱ्यांनी पहिल्यांदा मार्च अखेरीस आंबा खरेदी केला. त्यानंतर टप्याटप्याने चार कन्साईटमेंट कुवेत व चार कन्साईटमेंट रशियासाठी पाठविण्यात आल्या आहेत. कुवेत, रशियाकडून आंब्याला चांगली मागणी आहे. कुवेत येथे २ हजार १५४ मेट्रीक टन, तर रशियामध्ये ३ हजार ४४७ मेट्रीक टन आंबा निर्यात करण्यात आला. पाऊस सुरू होईपर्यंत दोन्ही देशांतून हापूसला मागणी आहे.
वाशी मार्केटमधून आंब्याची निर्यात सुरू आहे. निर्यातीपूर्वीच्या सर्व प्रक्रिया मुंबईत एकाच छताखाली होत असल्याने निर्यातदारांना सोपे झाले आहे.
कुवेत व रशियाला आंबा निर्यात करण्यासाठी बाष्पजल किंवा उष्णजल प्रक्रिया करावी लागत नसल्यामुळे केवळ फायटो सॅनिटरी प्रक्रिया करण्यात येत आहे. सध्या मुंबई मार्केटमध्ये १०० ते २०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे, तर स्थानिक बाजारपेठेत १२५ ते ३५० रुपये डझने दराने आंबा विकला जात आहे. कुवेत, रशियामध्ये जाणाऱ्या आंब्याला मात्र मोठा भाव मिळाला आहे. पावसाळा तोंडावर असला तरी आंब्याच्या निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षीपासून मँगोनेटद्वारे कुवेत व रशियाची बाजारपेठ खुली झाली आहे. भविष्यात अन्य देशांत निर्यात वाढण्याची शक्यता आहे.
उष्णजल प्रक्रिया अजून थंडच
युरोपीय देशांनी फळमाशीचे कारण देत आंबा निर्यातीवर बंदी आणली होती. निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच उष्णजलचा पर्याय ठेवण्यात आला. विविध तापमानात आंब्याची चाचणी घेण्यात आली. ४७ अंश सेल्सियस तापमानात ५० मिनिटे प्रक्रिया केली तर आंबा खराब होत नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तसा अहवाल अपेडाकडे सादर करण्यात आला. अपेडाने मान्यता दिली, परंतु त्यानंतर तो अहवाल पुढे फरिदाबाद येथील नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनकडे पाठविण्यात आला. मात्र, तेथील मान्यता अद्याप रखडली आहे.
काय आहे मँगोनेट?
दर्जेदार आंब्याची परदेशामध्ये थेट निर्यात होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी २०१५ मध्ये मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली. दोन वर्षे मँगोनेटद्वारे आंबा निर्यात झाला नाही. यावर्षी मँगोनेट अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांकडे परदेशातील व्यापाऱ्यांनी थेट संपर्क साधून आंबा खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक व मुंबई मार्केटपेक्षा चांगला दर उपलब्ध होत आहे.