पशुधन विभागाची २ कोटी ४६ लाखांची मागणी : रणजित देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 08:21 PM2019-01-23T20:21:17+5:302019-01-23T20:22:26+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या एकूण बजेटमध्ये २ कोटी ४६ लाख १० हजार ४६ रुपये एवढ्या निधीची मागणी करणार आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीच्या मासिक सभेत दिली.
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या एकूण बजेटमध्ये २ कोटी ४६ लाख १० हजार ४६ रुपये एवढ्या निधीची मागणी करणार आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीच्या मासिक सभेत दिली.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीची मासिक सभा उपाध्यक्ष तथा सभापती रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बॅ नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, सदस्या स्वरूपा विखाळे, सावी लोके, रोहिणी गावडे यांच्यासह अधिकार-कर्मचारी उपस्थित होते.
गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ६९ लाख निधी पशुसंवर्धन विभागाने वाढवून मागितला आहे. यावेळी २०१८-१९ साठी १ कोटी ७७ लाख ५० हजार निधी मंजूर झाला होता. या सर्व निधीच्या खर्चाचे प्रयोजन पूर्ण झाले आहे. लाभार्थी याद्या मंजूर करण्यात आल्या आहेत.
जानेवारी अखेर पर्यंत पशुसंवर्धन विभागाचा खर्च १०० टक्के झालेला असेल, असे यावेळी देसाई यांनी सांगितले. तसेच दुधाळ जनावरे वाटप योजनेतून एका सदस्याला दोन लाभार्थी यावर्षी देता आले आहेत. त्यामुळे अजून एक लाभार्थी निवडता यावा, यासाठी एकूण बजेटमध्ये २० लाख रुपयांचा वाढीव निधी मागितला असल्याचे यावेळी देसाई यांनी सांगितले.