सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:41 PM2017-12-20T14:41:44+5:302017-12-20T14:45:45+5:30
आपल्या विविध ३२ मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास २ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण राज्यभर सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही संघटनेच्यावतीने दिला आहे.
ओरोस : आपल्या विविध ३२ मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास २ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण राज्यभर सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही संघटनेच्यावतीने दिला आहे.
१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्यांची नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करणे, २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना निवड श्रेणी घ्यावी, संच मान्यतेतील सर्व त्रुटी दूर करून प्रचलित निकषानुसार संच मान्यता करण्यात यावी, पूर्वी नियुक्त शिक्षकांना अभियोग्यता चाचणीतून सुट द्यावी, सहाव्या वेतन आयोगातील ग्रेड पे मधील अन्याय दूर करून केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करणे आदी महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.
गेल्या तीन वर्षात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दिर्घकाळ प्रलंबित असून यात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक महासंघाने अनेक वेळा मागणी केली. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षात अनेक संघटनांच्या समवेत बैठका झाल्या. मात्र, बैठकीमध्ये प्रत्येकवेळा नवीन तारखा दिल्या.
अधिकाऱ्यांनी आश्वासने न पाळल्यामुळे शिक्षकांची दिवाळी अंधारातच गेली. वरिष्ठ व निवड श्रेणीबाबतचा अन्यायकारक व बेकायदेशीर शासनादेश काढण्यात आले. यामुळे विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेजबाबदार अधिकाऱ्यांनी शिक्षकांना देशोधडीला लावून संपूर्ण अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढली जात आहे. असाही आरोप शिक्षक संघटनेने केला आहे.
अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची संघटनेने भेट घेतली असता आपल्या मागण्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहोचविण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष के.जी. जाधवर, सचिव डी.जे. शितोळे, कार्याध्यक्ष एन.के.साळवी, उपाध्यक्ष व्ही.आर. खरात, पी.यू. देसाई, एस.डी.गावकर, महासंघ माजी उपाध्यक्ष शंकरराव कोकीतकर, एच.के.साटम, यु.आर.पाटील, एन.बी.चव्हाण, जे.जी.पाटील, तसेच महिला संघटना आदींसह कनिष्ठ शिक्षक संघटनेचे शंभरजणांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला होता.
प्रत्येकवेळी तारखा
आंदोलने करूनही केलेल्या मागण्यांवर अडीच वर्षेपेक्षा जास्त कालावधी होऊनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षभरात संघटनेच्या माध्यमातून बैठका व निर्णायक आश्वासने झाली. प्रत्येक वेळी तारखा दिल्या आहेत. शासनाने काहीच हालचाली केली नाहीत. तर २ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील असेही संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे.