परवानाधारक बंदुकांचे नूतनीकरण शुल्क कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 08:24 PM2019-01-23T20:24:06+5:302019-01-23T20:25:10+5:30
परवानाधारक बंदुकांच्या नूतनीकरण शुल्कात शासनाने भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून वाढविण्यात आलेले शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सिंधुदुर्ग : परवानाधारक बंदुकांच्या नूतनीकरण शुल्कात शासनाने भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून वाढविण्यात आलेले शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेती संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदूक परवाने देण्यात आले आहेत. या परवान्यांचे ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करावे लागते. यासाठी पूर्वी नाममात्र शुल्काची आकारणी करण्यात येत होती. मात्र आता दीड हजार रुपये शुल्क आकारले जाते. एवढे शुल्क भरून परवान्याचे नूतनीकरण करताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सद्यस्थितीत विविध कारणांमुळे सध्या शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. वन्य प्राण्यांचा उपद्र्रव, मजुरीचे वाढलेले दर, खते-बियाण्यांच्या वाढलेल्या किंमती तसेच निसर्गाच्या असहकारामुळे भातशेती तोट्यात जात आहे.
वन्य प्राण्यांच्या संकटामुळे पडीक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडे बंदुका असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे शासनाने नूतन बंदुकांच्या परवान्यांचे शुल्क कमी करावे, अशी मागणी होत आहे.