सिंधुदुर्ग : कसाल ते झाराप मार्गावर आवश्यक सुविधांची केंद्राकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 04:32 PM2018-10-05T16:32:48+5:302018-10-05T16:35:07+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्यातील कसाल ते झाराप या मार्गावर आवश्यक असलेल्या सुविधांबाबतच्या मागण्या केंद्र्राकडे पाठविण्यात येणार असून, तेथून अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती महामार्गाचे मुख्य कार्यकारी अभियंता वि. सु. देशपांडे यांनी कुडाळ तालुका बचाव समितीशी झालेल्या बैठकीत दिली. यावेळी देशपांडे यांनी समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली.
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्यातील कसाल ते झाराप या मार्गावर आवश्यक असलेल्या सुविधांबाबतच्या मागण्या केंद्र्राकडे पाठविण्यात येणार असून, तेथून अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती महामार्गाचे मुख्य कार्यकारी अभियंता वि. सु. देशपांडे यांनी कुडाळ तालुका बचाव समितीशी झालेल्या बैठकीत दिली. यावेळी देशपांडे यांनी समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली.
चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर कुडाळ तालुका बचाव समितीने कसाल ते झारापपर्यंत ग्रामस्थांना सोयीस्कर ठरतील अशा विविध मागण्या केल्या. या संदर्भात अॅड. निलेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे या महामार्गाचे मुख्य कार्यकारी अभियंता देशपांडे यांच्याशी सभा आयोजित केली होती.
यावेळी बचाव समितीचे अध्यक्ष अॅड. राजीव बिले, काका कुडाळकर, गजानन कांदळगावकर, महेश पावसकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत कुडाळ येथे हॉटेल राज पॅलेस दरम्यान उड्डाण पूल करणे, त्याच्या सुरुवातीपासून शहरात वाहने येण्या-जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा, तेर्सेबांबर्डे-मळावाडी येथे अंडरपासबाबत देशपांडे यांनी स्वत: पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरविले. सरसकट सेवारस्त्याबाबत मात्र त्यांनी आवश्यकतेनुसार काही बदल करण्याबाबत विचार करण्याचे मान्य केले.
कसाल हायस्कूलकडील अंडरपास रस्त्याबाबत विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची ग्वाही देशपांडे यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी आवश्यक अंडरपासऐवजी आवश्यक तेथे दुभाजकाच्या ठिकाणी रेफ्युजी एरिया करण्याचे मान्य केले. त्यामुळे सुरक्षितरित्या मध्यभागी थांबता येणार आहे.
पावशी येथील लिंग मंदिर वाचविण्याबाबत आवश्यक बदली जागा गावकऱ्यांनी दिल्यास निर्णय घेता येईल, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले. कुडाळ शहरातील सत्यम हॉटेल येथील बस मार्ग देण्याबाबत मागणी केली असता शहरातच योग्य त्या ठिकाणी बस मार्ग देण्याचे मान्य केले. कसाल ते झाराप या दरम्यान काही बस थांबे वाढवून मिळावेत, या मागणीवर एसटी प्रशासनाशी चर्चा करून योग्य त्या ठिकाणी बस थांबे देण्याचे मान्य केल्याचे बचाव समितीच्या सदस्यांनी सांगितले.