वेंगुर्ले तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांचे धरणे आंदोलन, मागण्यांसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 03:03 PM2017-12-11T15:03:18+5:302017-12-11T15:06:12+5:30
वेंगुर्ले तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांना द्यावयाचे मागणी पत्र निवेदनाच्या स्वरुपात तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे दिले.
वेंगुर्ले : तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांना द्यावयाचे मागणी पत्र निवेदनाच्या स्वरुपात तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे दिले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य महासंघ अनेक आंदोलने करीत आहे. संघटनेसमवेत झालेल्या अनेक बैठकांमध्ये मागण्या मान्य करुनही त्याचे शासनाने अध्यादेश काढले नाहीत.
गेल्या चार-पाच वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयात नियुक्त शिक्षकांना मान्यता नाही. त्यांना विनावेतन काम करावे लागते. २००५ पासून विनाअनुदान शिक्षकांना संस्था देत असलेल्या तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. १ नोव्हेंबर २००५ पासून राज्यात नवीन पेन्शन योजना लागू झाली. पण कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी ही योजना कागदावरच आहे.
२४ वर्षांनंतर निवडश्रेणी सर्वांना विना अट मिळावी, पूर्वीच्या ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा कराव्यात, शिक्षण सेवक योजना रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव दिलीप शितोळे तसेच कार्यकारिणी सदस्य प्रा. जे. जी. पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते. आंदोलनस्थळी शिक्षकेतर संघटनेचे सचिव अनिल राणे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.