डेंग्यूची साथ आटोक्यात
By admin | Published: December 11, 2014 12:08 AM2014-12-11T00:08:00+5:302014-12-11T00:35:48+5:30
रुग्णांची संख्या २१ : आरोग्यपथक २४ तास कार्यरत
रत्नागिरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नानंतर फणसवळे गावातील कोंडवाडी व आंबेकरवाडीतील डेंग्यूची साथ आटोक्यात आली आहे. दरम्यान, दाखल असलेल्या रुग्णांपैकी
आणखी एकास डेंग्यूची लागण असल्याचे काल, मंगळवारी रात्री स्पष्ट झाल्याने रुग्णांची संख्या २१ झाली आहे़
साथग्रस्त फणसवळे गावात जिल्हा परिषदेचे आरोग्यपथक २४ तास कार्यरत ठेवण्यात आले असून, ते पथक घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करीत आहे़ येथील कोणाला ताप येऊ नये, यासाठी या आरोग्य पथकाकडून काळजी घेण्यात येत आहे़
आतापर्र्यंत फणसवळेमध्ये तापाचे ७० रुग्ण सापडले असून, त्यामध्ये २१ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ आतापर्यंत डेंग्यूच्या जिल्ह्यातील साथीमध्ये फणसवळेतील डेंग्यूची सर्वांत मोठी साथ आहे़ त्यामुळे आरोग्य विभागाने फार गांभीर्याने याकडे लक्ष देऊन गावातील सर्वच पाणी साठविण्याच्या भांड्यातील पाणी नमुन्याची तपासणी केली असून, त्यामध्ये डेंग्यूच्या आळ्या सापडल्या नाहीत़ तरीही कोरडा दिवस पाळण्यात आला आहे़
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये फणसवळेतील आतापर्यंत तापाचे ४५ रुग्ण दाखल करण्यात आले होते़ त्यापैकी सात रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे़ इतर रुग्णांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे़ तसेच आज, बुधवारी फणसवळे परिसरामध्ये एकही तापाचा रुग्ण आढळून आलेला नाही़ त्यामुळे येथील तापाची साथही आटोक्यात आली आहे़ (शहर वार्ताहर)