खेडमध्ये चौघांना डेंग्यूची लागण
By admin | Published: April 20, 2017 12:04 AM2017-04-20T00:04:37+5:302017-04-20T00:04:37+5:30
खेडमध्ये चौघांना डेंग्यूची लागण
खेड : खेड तालुक्यातील कुळवंडी जांभूळगाव येथील २२ जणांना तापाची लागण झाली असून, त्यातील चारजण डेंग्यूबाधित असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या चौघांवर कळंबणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संचिता गणपत जाधव (वय ४०), मधुकर गंगाराम निकम (६२), सानिका अरविंद निकम (१४), अनुष्का भरत निकम (१०) अशी डेंग्यूबाधितांची नावे आहेत. कुळवंडी जांभुळगावात ८२ घरे आहेत. यातील बहुतांश गावातील लोक नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत. घरातील शौचालयाच्या तसेच टाकीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास झाल्याने वाडीमध्ये गेले पाच दिवस तापाची साथ पसरल्याचा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला. त्यामुळे येथील जवळपास २२ ग्रामस्थांना या तापाची लागण झाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. एस. अभिवंत यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. आता या सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, यातील सहा रुग्णांना तपासल्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आला. त्यामुळे या रुग्णांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या सर्वांचे रक्ताचे नमुने मंगळवारी रत्नागिरी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल प्राप्त झाले असून, सहा पैकी चारजणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. (प्रतिनिधी)