देवगड-निपाणी राज्यमार्ग खड्डेमय

By admin | Published: August 8, 2016 11:20 PM2016-08-08T23:20:46+5:302016-08-08T23:35:27+5:30

फोंडा बाजारपेठेत १-१ फुटाचे खड्डे : वाहतुकीची कोंडी कायम; प्रशासन मात्र सुस्तच

Deogarh-Dhadani highway paved | देवगड-निपाणी राज्यमार्ग खड्डेमय

देवगड-निपाणी राज्यमार्ग खड्डेमय

Next

विशाल रेवडेकर ल्ल फोंडाघाट
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले फोंडाघाट हे गाव. ऐतेहासिक बाजारपेठेचा वारसा असलेल्या या बाजारपेठेतून जिल्ह्यातील इतर गावांना मालवाहतूक केली जाते. सोमवार आठवडा बाजार असला तरी शनिवारी रात्रभर या गावात पान बाजार चालतो. संपूर्ण जिल्ह्यातील पानांचे व्यापारी एकत्र या बाजारासाठी येतात. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात या गावाची ओळख असणारा ‘मध’ याच गावाचे नाव उज्ज्वल करतो. मात्र, सध्या याच ऐतिहासिक गावातील नागरिकांना अनेक समस्यांनी भेडसावले आहे. यातील प्रमुख समस्या म्हणजे रस्ता, वाहतूक व खड्डे होय.
देवगड-निपाणी राज्य मार्गावर असलेली ही फोंडाघाटची ऐतिहासिक बाजारपेठ असंख्य खड्ड्यांमुळे चर्चेत आली आहे. मागील काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम झाल्यानेच या बाजारपेठेत तब्बल १-१ फुटांपेक्षा मोठे खड्डे या राज्यमार्गावर पडल्याचे ठिकठिकाणी दिसताहेत. याकडे स्थानिक पदाधिकारी व बांधकाम विभाग पूर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. एकीकडे होत असलेली वाहतुकीची कोंडी व बाजारपेठेत असलेले भलेमोठे खड्डे यामुळे पादचारी व वाहन चालकांमध्ये प्रशासनविरोधात तीव्र नाराजी आहे. या बाजारपेठेतच एका निवृत्त एस.टी. कर्मचाऱ्याला वाहतुकीच्या कोंडी दरम्यान गंभीर इजा झाली होती. त्यानंतर एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा मालवाहू ट्रकची धडक लागून मृत्यू झाला होता. अशा गंभीर घटना घडूनही बांधकाम विभागाने याबाबत गंभीर दिसत नाही.
येथील रस्ता रुंदीकरणाच्या व वाहतूक कोंडीच्या विषयात बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे. मागील काही माहिन्यांपूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांना याच बाजारपेठेतून जात असताना तब्बल एक तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तत्काळ त्यांनी बांधकाम विभागाला धारेवर धरत फोंडाघाट बाजारपेठ रुंदीकरणाच्या सूचना दिल्या. तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी तातडीने फोंडाघाट बसस्थानकानजीकचे अतिक्रमण हटवत पुलाची रुंदी वाढवून घेतली. मात्र, एखाद्या नाटकावर पडदा पडावा तसा पालकमंत्र्यांची पाठ फिरताच या रस्ता रुंदीकरणाच्या विषयावर पडदा पडला व रस्ता रुंदीकरण फक्त कागदापुरतेच मर्यादित राहिले.
पोलिसांचे कर्तव्य फोंडा आय.टी. आय.पर्यंतच?
वाहनचालकांना शिस्त लागावी तसेच कोल्हापूर ते फोंडा अंतर ३ तासात पार व्हावे यासाठी वाहन चालकाला ५ मिनीटांची बाजारपेठ पार करायला तासन तास वाट पहावी लागते. त्यामुळे इथल्या व्यापारावर देखील याचा परिणाम होतो. स्थानिक ग्रामस्थ तसेच काही लोकप्रतिनिधींनी वाहतूक पोलिस मिळावा यासाठी कणकवली पोलिसांकडे वारंवार मागणी केली होती. पण अपुरेकर्मचारीचे कारण सांगत एकही वाहतूक पोलिस दिला नाही. केव्हातरी वाहतूक पोलिस येतात तेही ४ ते ५ जणांच्या गटाने मात्र बाजार पेठेच्या अलीकडे १ किलोमीटर असलेल्या आय.टी. आय.पर्यंत तेही माल, चिरे, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पावती करण्यासाठी कधी कधी तर बाजारपेठ पार करून जायची असेल आणि बाजारत वाहतुकीची कोंडी होत असेल तर हे वाहतूक पोलिस मागील रस्त्याचा वापर करतात. मात्र वाहतुकीची शिस्त लावण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत नासल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते.
गणेशाच्या आगमनापूर्वीच ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे
काही दिवसांवर आलेल्या चतुर्थी सणापूर्वी रस्त्याची झालेली दुरवस्था दूर करावी कारण श्रींच्या मूर्तींची वाहतूक होताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच मुंबई-पुणे येथून येणारे चतुर्थी सणात येणारे चाकरमानी फोंडाघाट मार्गाला जिल्ह्यात येण्यास पसंती देतात. मात्र प्रवेश द्वारापाशीच असलेल्या या गावात होत असलेली वाहतूक कोंडीकडे गांर्भीयाने पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Deogarh-Dhadani highway paved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.