देवगड, मालवणात मुसळधार

By admin | Published: August 31, 2014 12:22 AM2014-08-31T00:22:42+5:302014-08-31T00:23:58+5:30

सोमवारपेठेत पाणी घुसले : जनजीवन विस्कळीत; देवबागमध्ये घरावर भिंत कोसळून नुकसान

Deogarh, Rawalpara in Malvan | देवगड, मालवणात मुसळधार

देवगड, मालवणात मुसळधार

Next

मालवण : तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून मालवण सोमवारपेठेत समुद्राचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
गणेश चतुर्थी सणाच्या सुरूवातीपासूनच पावसाने मालवणवासीयांना झोडपून काढले. शुक्रवारपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे देवबाग केळुसकरवाडी येथील जुजे फर्नांडिस यांच्या घराशेजारील अविसा हॉटेलची संरक्षक भिंत कोसळल्याने घराच्या भितींना मोठ्या प्रमाणात तडे गेले. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास फर्र्नाडिस यांच्या घरात सुनिता लॉरेन्स फर्र्नाडिस, जुजे लॉरेन्स फर्नांडिस, शाबीन लॉरेन्स फर्नांडिस, लॉबीन लॉरेन्स फर्नांडिस, गिरगोल फर्नांडिस हे सर्वजण झोपले होते. रात्री अचानक घराला हादरा बसल्याने त्यांना जाग आली. संरक्षक भिंत कोसळल्याने तिच्या दगडाखाली फर्र्नाडिस कुटुंबियांची दुचाकी गाडी, दोन सायकली, बोअरवेल पंप गाडले गेल्याने त्यांचे नुकसान झाले.
नुकसानीची माहिती समजताच मंडल अधिकारी मंगेश तपकीरकर, तलाठी तानवडे, पोलीस पाटील भानुदास येरागी यांनी भेट देवून नुकसानीचा पंचनामा केला. शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख बबन शिंदे, महेश शिरपुटे, नंदू गवंडी, गौरव वेर्लेकर, सोमनाथ लांबोर यांनी फर्र्नाडिस कुटुंबियांची भेट घेतली. तालुक्यात आंबडोस येथील रामदास शंकर साळगावकर यांच्या घराची भिंत कोसळून ७ हजार रूपयांचे नुकसान झाले. आंबेरी येथील प्रमोद अर्जुन कांबळी यांचा शेतमांगर कोसळून ७ हजार रूपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने देवगड- निपाणी राज्य मार्गावर जामसंडे फाटक क्लास येथे जुनाट वटवृक्ष मुळासकट उन्मळून पडला. यामुळे या मार्गावर पाच तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
शुक्रवारपासून पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली होती. शनिवारी पहाटे ४ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू झाला. तो सहा तासानंतर आटोक्यात आला. या पावसामुळे जामसंडेतील जुनाट वटवृक्ष सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उन्मळून पडले. यामुळे जामसंडेतील वीज पुरवठा दोन तासांसाठी खंडीत करण्यात आला होता. या वटवृक्षाच्या परिसरातील विजेच्या तारा, केबल तुटून पडल्या. सकाळच्या सत्रात या मार्गावर बेळगाव, अक्कलकोट तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसेसची वर्दळ असते. तसेच पादचारी, पाळीव जनावरांचीही ये-जा असते. वडाचे झाड पडले तेव्हा या भागात कोणीही नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. मात्र यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गांवरून वळवण्यात आली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास स्थानिक प्रशासनाने वडाचे झाड तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान, या पावसाने जामसंडे पेट्रोलपंप ते फाटक क्लास या परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. कावलेवाडी, वेळवाडी मार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
वाडा चांभारभाटी, दहिबाव, नारिंग्रे पूल या परिसरात पाणी भरल्याने या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. तसेच दाभोळे गावातील माड बागायती, शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. तसेच मिठबाव- तांबळडेग मार्गावर वटवृक्ष कोसळल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला होता. पावसामुळे हिंदळे येथील भरत कुंभार आणि शांताराम कुंभार यांना त्यांच्या घरावर दरड कोसळण्याच्या स्थितीत असल्याची नोटीस देवगड तहसीलदारांकडून शनिवारी बजावण्यात आली होती.
दिवसभरात देवगडमध्ये २०७ मि.मी. तर एकूण २०२१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. मात्र, कोणत्याही मालमत्तेच्या नुकसानीची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात झालेली नव्हती. (वार्ताहर)

Web Title: Deogarh, Rawalpara in Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.