देवगडात दूरध्वनी सेवेचा बोजवारा
By admin | Published: August 16, 2015 09:53 PM2015-08-16T21:53:57+5:302015-08-16T21:53:57+5:30
दूरसंचार विभागाला निवेदन : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नंदूशेठ घाटे यांचा इशारा
देवगड : अपुरे कर्मचारी, साहित्याचा तुटवडा तसेच अधिकाऱ्यांची उदासीनतेमुळे देवगड तालुक्यातील दूरध्वनी सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे. दूरसंचार निगमने याकडे लक्ष घालून तालुक्यातील दूरध्वनी सेवा सुरळीत करून ग्राहकांना चांगली सेवा द्यावी, असे टेलिफोन विभागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदूशेठ घाटे यांनी असे निवेदन दिले आहे. देवगड टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नंदूशेठ घाटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. यावेळी पंचायत समितीे सदस्य प्रकाश गुरव, अभय बापट, ग्रामपंचायत सदस्य अभय कुळकर्णी, ढोके, शिवानंद पेडणेकर, रामानंद वाळके, बंटी कदम, विनायक जोईल, सुधीर मांजरेकर, आदी उपस्थित होते. मुंबई - गोवा महामार्गापासून ४० किलोमीटर आत असलेल्या देवगड तालुक्यात अधिकारी काम करायला येत नाही. त्यामुळे आॅफिस कामांसाठी व फिल्डवरील कामांसाठी कंत्राटी कामगारांवर अवलंबून रहावे लागते. साहित्याचा तुटवडा असल्याने इच्छा असूनही कर्मचाऱ्यांना जनतेच्या समस्या सोडविता येत नाहीत. याचा फटका कंत्राटी कर्मचाऱ्याला बसतो व ग्राहकांच्या रोषाला त्याला बळी पडावे लागते. कारण ग्रामीण भागातील जनता ही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. याचा परिणाम म्हणून बहुतांश लोक हे या सेवेपासून दूर होत आहेत. सर्व बाबींमध्ये सामान्य ग्राहकांचा दोष काय? कार्यालयाकडून बिल वेळेवर भरले नाही तर सेवा तत्काळ खंडित करता. मग वेळेवर बिले अदा केल्यानंतर सेवा नियमित व अखंडितपणे देणे कर्तव्य नाही का? या बाबींचा विचार करून दूरध्वनी सेवा तत्काळ सुरळीत करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चा काढून जाब विचारण्यात येईल. (प्रतिनिधी)
अपुरे कर्मचारी, साहित्याचा तुटवडा
देवगड तालुक्यात १९ सबस्टेशनपैकी ७ ठिकाणी लाईनमन आहेत व उरलेल्या १२ ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच सर्व कारभार अवलंबून आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधनही मिळत नाही.
तालुक्यातील १९ सबस्टेशनला प्रत्येकी २ याप्रमाणे ३८ बॅटऱ्यांची गरज आहे. पण; बहुतांश ठिकाणी बॅटऱ्या उपलब्ध नसल्याने वीज गेली की, फोन सेवा बंद होते, व त्यावेळी ग्राहकांची गैरसोय होते.
देवगड तालुक्यात सी.डी.एम.ए. तरंग सेवा ही फक्त नावालाच कार्यरत आहे, असे दिसते. कारण बहुतांश ठिकाणी ही सेवा बंदच आहे. बंद झाल्यास त्याची दुरुस्तीसुद्धा मुख्य कार्यालयात होत नाही.
लाईट गेल्यावर काही वेळेला मोबाईल टॉवरही बंद होतात; पण इतर खासगी सेवा सुरळीतपणे चालू आहेत.