मालकीबाबत कुळांमध्येच उदासीनता
By admin | Published: November 10, 2015 09:22 PM2015-11-10T21:22:18+5:302015-11-11T00:15:36+5:30
दोन जिल्ह्यात अधिनियम लागू : मालकी हक्क प्रस्थापित करण्यात चिपळूण अग्रक्रमाकांवर
रत्नागिरी : कुळांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळावा, यासाठी शासनाने अगदी अल्पशी नजराणाची रक्कम भरून त्यांना मालक होण्याची संधी दिली असली तरी याबाबत कुळांमध्येच कमालीची उदासीनता दिसत आहे. याबाबत अनेक उपक्रम राबवूनही आतापर्यंत ५८ टक्के खातेदारांनीच नजराणाची रक्कम भरून मालकी प्रस्थापित केली आहे. मात्र, सर्वाधिक मालकी हक्क प्रस्थापित करण्यात चिपळूण तालुका अग्रक्रमांकावर आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ लागू करण्यात आला आहे. आता कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही, अशी सुधारणा या कायद्यात करण्यात आली आहे. त्यानुसार आता कुळांनी खरेदी केलेल्या जमिनीची खरेदी - विक्री, देणगी, अदलाबदल, गहाण ठेवणे, भाडेपट्ट्याने देणे, अभिहस्तांतरण यासाठी कोणत्याही पूर्वमंजुरीची आवश्यकता राहणार नाही. मात्र, त्यासाठी ४० पट नजराणा भरून मालकी हक्क प्रस्तापित करणे गरजेचे आहे.
या जमिनी मालकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी त्या जमिनीच्या आकाराच्या ४० पट नजराणा भरून सातबारावर रितसर नोंद करून घेणे अनिवार्य आहे. नजराण्याची रक्कम ही अतिशय अल्प म्हणजे अगदी पाच रुपयांपासून पुढे अशी आहे. मात्र, याबाबत कुळांमध्येच उदासीनता दिसून येत आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने कुळांची मालकी प्रस्तापित होऊन त्यांचे नाव सातबारावर नोंदवण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. मात्र, त्यालाही कुळांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात एक लाख ८० हजार ७९१ खातेदार आणि २ लाख ३९ हजार १०९ पोटहिस्से आहेत. मात्र, आत्तापर्यंत ९१,५३४ खातेदारांनी १ लाख ३८ हजार ६४० पोटहिस्से यांची नजराणा रक्कम भरून जमीनीवर मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. अजूनही ८९ हजार २५७ खातेदारांची नजराणा रक्कम भरावयाची आहे.
कुळांना मालकी हक्क प्रस्थापित करून देण्याचे सर्वाधिक काम चिपळूण तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल गुहागर, रत्नागिरी आणि लांजाचा क्रमांक लागतो. संगमेश्वरमध्ये निम्म्यापेक्षा जास्त कुळांनी या हक्काचा लाभ घेतला आहे. मात्र, मंडणगड राजापूर आणि दापोली तालुक्यांमध्ये अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे. (प्रतिनिधी)
सध्या या जमिनी नियंत्रण सत्ता प्रकार (निसप्र) पद्धतीने शासनाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यावर इतर कुणीही हक्क प्रस्थापित करू शकत नाहीत. यापैकी काही सहहिस्सेदार बाहेरगावी राहतात. त्यामुळे मालकी हक्काबाबत कुळे फारसा गंभीरपणे विचार करताना दिसत नाहीत. जेव्हा जमीन विकायची असेल, तेव्हा बघू, असे म्हणत आहेत.
तालुकाखातेदारनजराणा भरलेले शिल्लक
मंडणगड२२,०८९३५४२१,७३५
दापोली२८,८१३३,९७२२४,८४१
खेड१७,३३२१३,०४७४,७८५
चिपळूण२१,३८४२१,०३०३५४
संगमेश्वर२३,६३५१२,५१७११,११८
गुहागर १२,७१५११,२५५१,४६०
रत्नागिरी ३१३९४२१,५२९९,८६५
राजापूर१४,५०९२,६५४११,८५५
लांजा ८,४२०५,१७६३,२४४
एकूण१,८०,७९१९१,५३४८९,२५७
आतापर्यंत ५८ टक्के खातेदारांनीच नजराणाची रक्कम भरून मालकी हक्क केला प्रस्थापित.
कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीच्या विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही.
नजराणाची रक्कम अतिशय अल्प आहे.