धरणसाठ्यात घसरण, पदरी वणवण...

By admin | Published: June 11, 2015 11:13 PM2015-06-11T23:13:58+5:302015-06-12T00:42:23+5:30

कोरड कायम : धडाकेबाज मान्सूनची बळीराजाला प्रतीक्षा

Depression falling, declaration ... | धरणसाठ्यात घसरण, पदरी वणवण...

धरणसाठ्यात घसरण, पदरी वणवण...

Next

प्रकाश वराडकर - रत्नागिरी
जिल्ह्यातील रत्नागिरी पाटबंधारे विभाग (द.) अंतर्गत येणाऱ्या २४ धरणांपैकी ७ धरणेवगळता अन्य सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घसरण झाली आहे. मान्सूनचे धडाकेबाज आगमन अद्याप झालेले नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू आहे. अनेक ठिकाणी भाताची पेरणी पूर्ण झाली असून, बळीराजा आता आकाशाकडे नजर लावून आहे.
रत्नागिरी पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात खेड येथे असलेल्या नातूवाडी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. या धरणाचा प्रकल्पीय पाणीसाठा २८.०८० दशलक्ष घनमीटर असून, खेडमधील काही नळयोजना, सिंचन क्षेत्र या धरणावर अवलंबून आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे परिसरातील उद्भवात पाणी उपलब्ध होते. मात्र, धरणातील पाणीसाठाच संपुष्टात आल्याने पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.
आंबतखोल, मालघर, अडरे, गुहागर, शिरवली, सोंडेघर व शेरेवाडी या सात धरणांमध्ये १ दशलक्ष घनमीटर्सपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. उर्वरित १६ पैकी केळंबा धरणातील पाणीसाठा १७ फेब्रुवारी २०१५ रोजी संपला आहे. बारेवाडी या धरणातील पाणीसाठा २६ डिसेंबर २०१४ रोजी संपला आहे. गवाणे, निवे, असुर्डे व फणसवाडी या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे.
रत्नागिरी एमआयडीसीकडून हरचेरी धरणातू एमआयडीसीबरोबरच परिसरातील कुवारबाव, पोमेंडी, नाचणे, मिरजोळे, शिरगाव, कर्ला या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. या धरणातही जून महिनाअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. धरणातील पाणी साठ्याबाबत चिंता असली तरी जून महिना पुरेल इतके असल्याचे सांगण्यात येत असल्याने किमान नागरिकांना पुढील काही दिवस पावसाची प्रतीक्षा करता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी)


शीळमध्ये मुबलक पाणी
रत्नागिरी तालुक्यातील शीळ धरण पाटबंधारेच्या चिपळूण विभागाकडे असून, या धरणातून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. येत्या जुलै महिन्यापर्यंत पाऊस आला नाही तरी हे पाणी पुरेल, असे सांगण्यात आले आहे. मात्र येत्या आठवड्यात पाऊस झाला तर पुढील टंचाई टळेल.


७५ टक्के पाणी संपले
रत्नागिरी पाटबंधारे विभाग (दक्षिण) अंतर्गत २४ धरणांमध्ये प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता ७४.८६ दशलक्ष घनमीटर आहे. ११ जून २०१५ अखेर यातील दोन धरणातील साठा संपला आहे. उर्वरित धरणांमध्ये १७.७४० दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. प्रकल्पीय साठा व सध्याचा साठा पाहता या धरणांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठा आहे. ७५ टक्के पाणीसाठा संपुष्टात आला आहे.

Web Title: Depression falling, declaration ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.