पर्यटनस्थळ विकासापासून वंचित
By admin | Published: June 30, 2015 09:49 PM2015-06-30T21:49:32+5:302015-06-30T21:49:32+5:30
तळवणेतील प्रश्न : ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून केले सुशोभीकरण
सुनील गोवेकर - आरोंदा --निसर्गसौंदर्याने नटलेल्या आपल्या जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची असलेली अनेक ठिकाणे आहेत. त्यातील काही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी महत्त्वाची वाटतात. परंतु अशी जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे आहेत, की त्यांना पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळूनही विकासापासून वंचित राहिली आहेत. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावातील पांडवकालीन बटकीची तळी हे त्यापैकीच एक ठिकाण. मात्र, ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून आणि मेहनतीने या तळीतील गाळ उपसा करून सुशोभीकरण करून हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी खुले केले आहे.
बटकीची तळी, जवळच असणारे गोरक्षक गोठण मंदिर तसेच बटकीच्या तळीपासून ५० मीटरवर असलेली पन्नीची तळी हा परिसर अतिशय सुंदर आणि विलोभनीय असा आहे. बटकीची तळी पांडवकालीन असून, पांडवांनी ही तळी एका रात्रीत खोदली होती, असे जाणकार लोक सांगतात. तळी शेजारीच असणारे गोरक्षक गोठणदेव मंदिर हेही पांडवकालीन असून, गावच्या देवस्थानापासून काहीसे अलिप्त आहे. दरवर्षी या मंदिरात महापूजेचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमास मोठी गर्दी असते. महाप्रसाद व इतर धार्मिक कार्यक्रम याठिकाणी होतात. हे जागृत देवस्थान असून, गोठणदेवाला घोंगडीचा नवस बोलला जातो. गाय किंवा म्हशीच्या दुधाची पहिली धार या देवाला वाहण्याची फार जुनी प्रथा आहे.
पांडवकालीन या तळीतील गाळ खोदल्यापासून उपसा करण्यात आला नव्हता. मात्र, गेल्या माहिन्यातच ग्रामस्थ तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीतून गाळ उपसा करण्यात आला आहे. कोणताही शासकीय निधी नसल्याने तळवणे ग्रामस्थ, जयगणेश मित्रमंडळ व बाजूच्या कोंडुरा, साटेली गावातील काही लोकांच्या सहकार्यातून गाळ उपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले.
लोकवर्गणीतून जमा झालेले ४२ हजार रुपये आणि इतर मदतीतून तीन दिवस जेसीबीचा वापर करून गाळ उपसा करण्यात आला. गाळ उपसा केल्यानंतर या तळीला तीन थर असल्याचे दिसून आले. या परिसरात ही एकमेव तळी पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.
लोकवस्तीपासून थोडे दूर अंतरावर असणाऱ्या या देवस्थानाकडे जाण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्ता केला आहे. याठिकाणी विद्युत सेवा उपलब्ध नाही. परंतु कार्यक्रमवेळी मात्र जनरेटरचा वापर करून मंदिर सुशोभीत केले जाते. पावसाळ्यात बटकीच्या तळीपासून काही अंतरावर असलेला धबधबाही लक्ष वेधतो. तळीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, बारमाही पाणी असणाऱ्या या तळीत एकही मासा दृष्टीस पडत नाही.
दुधाची धार
वाहण्याची प्रथा
सुमारे साठ-सत्तर वर्षांपूर्वी गावातील गुरांना पायलागणीची साथ आली होती. त्यावेळेपासून गोरक्षक गोठणदेव मंदिरात महापूजेचे आयोजन केले जाते, असे सांगितले जाते. त्यामुळेच कदाचित गाय-म्हशीच्या दुधाची पहिली धार देवावर वाहण्याची प्रथा रुळली असावी.
‘लोकमत’मधून पहिली प्रसिद्धी
बटकीची तळी या पर्यटनस्थळाला पहिली प्रसिद्धी ‘लोकमत’ मधूनच देण्यात आली होती. हे ठिकाण पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने याचा विकास करण्याची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले होते. आता ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून हा परिसर सुशोभीत करण्यात आला असून, पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच आहे.