जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा

By admin | Published: June 13, 2014 01:43 AM2014-06-13T01:43:12+5:302014-06-13T01:43:54+5:30

प्राजक्ता ठाकूर : युपीएससी परीक्षेतील यशाबाबत ‘लोकमत’शी बातचित

Desire to work as Collector | जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा

जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा

Next

रजनीकांत कदम - कुडाळ
मला लोकांची सेवा करण्याची संधी हवी आहे. त्यासाठी मी जिल्हाधिकारी आणि इन्कमटॅक्स अधिकारी म्हणून काम करण्यास इच्छूक असल्याचा पसंतीक्रम आपण युपीएससी बोर्डाला दिला होता. त्यामुळे भविष्यात आपल्याला जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल. असा आशावाद युपीएससी परीक्षेत राज्यात चौथी आणि देशात १३२ व्या आलेल्या प्राजक्ता ठाकूर हिने ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
आपल्या यशाच्या रहस्याबाबत बोलताना प्राजक्ता म्हणाली, सन २०१० साली पुण्याला इंजिनिअरींग पूर्ण केले. लगेचच युपीएससीच्या अभ्यासाला सुरूवात केली. २०११ व १२ साली प्रिलियम एक्झाम दिल्या. फायनलच्या पहिल्याच परीक्षेमध्ये यश संपादन केले. महत्त्वाचे म्हणजे या तिन्ही परीक्षेला परीक्षेचा पॅटर्न बदललेला होता. तर शेवटच्या परीक्षेला पूर्णपणे परीक्षेचा पॅटर्न बदललेला होता. त्यामुळे युपीएससीचे हे एक माझ्यासमोर मोठे आव्हान होते.
वडीलांच्या इच्छेखातर..
माझे बाबा, सर्कल अधिकारी तसेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्याकडून या स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळाली. माझ्या वडीलांनी सांगितले की, युपीएससी, एमपीएससी परीक्षांमधून एक अधिकारी बनून जनसेवा कर. वडीलांची इच्छा असल्यामुळे इंजिनिअर झाल्यानंतर या परीक्षांच्या तयारीला लागले.
परीक्षा देत असताना महाराष्ट्र बोर्डची विद्यार्थिनी होती. तसेच सेमी इंग्लिश होते. परंतु माझ्याबरोबर असणारे विद्यार्थी हे मोठमोठ्या चांगल्या आयटी अशा कॉलेजमधून तिथे आलेले होते. जास्तीत जास्त या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे असते की दिल्लीला जाऊन कोचिंग घेतले तरच आपल्याला यश संपादन करता येते. परंतु मी एकदाही दिल्लीला जावून कोचिंग घेतलेले नाही. फक्त पुणे व सिंधुदुर्गातच राहून या परीक्षेचा अभ्यास केला. त्यामुळे आपण कुठे जाऊन शिकतो, त्याच्यापेक्षा कशापद्धतीने अभ्यास करतो, हे महत्त्वाचे आहे.
११ तास अभ्यासानेच शक्य
परीक्षेच्या आधी तीन महिने ११ ते १२ तास अभ्यास केला. माझे कुडाळ कन्याशाळा येथे पहिली ते चौथी व कुडाळ हायस्कूल येथे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. मला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्याशिवाय ज्युदो कराटे स्पर्धेतही मी प्राविण्य मिळविले होते. दूरदर्शनच्या ‘राग एक तरंग अनेक’ या कार्यक्रमात मी भाग घेऊन पारितोषिक मिळविले होते. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे येथे गेले. तिथे बी. ई. झाल्यानंतर श्रमप्रबोधिनीतर्फे युपीएससीचा अभ्यास केला. यावेळी तर दररोज १६ ते १८ तास अभ्यास करावा लागत होता.
महाराष्ट्रातून चौथी
सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ साली पुण्याला शिक्षणासाठी गेलेल्या त्यापूर्वी दहावीत ८८ टक्के तर बारावीला (विज्ञान शाखा) ८२ टक्के गुण मिळविलेल्या प्राजक्ता हिने युपीएससी परीक्षेसाठी १८ हजार विद्यार्थ्यांपैकी १५०० विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण होवून देशपातळीवरच्या या परीक्षेत महाराष्ट्रातून १३२ वी येण्याचा मान मिळविला आहे. तसेच ती महाराष्ट्रातून चौथी आली आहे. या तिच्या यशात वडील प्रभाकर, आई प्रज्ञा, श्रम प्रबोधिनीचे प्रमुख विवेक कुलकर्णी, भूषण देशमुख, तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांचे विशेष मार्गदर्शन तिला लाभले आहे. प्राजक्ता ही जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार असल्याने कुडाळ तालुक्याला त्याचा खरा मान मिळणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही त्यामुळे देशपातळीवर नावलौकीक होण्यास मदत झाली आहे.
 

Web Title: Desire to work as Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.