‘हॅम्लेट’चे काम करण्याची इच्छा अपूर्णच राहिली
By Admin | Published: January 19, 2015 11:19 PM2015-01-19T23:19:36+5:302015-01-20T00:08:35+5:30
जयंत सावरकर : जीवन संघर्षात अभिनयाने दिली ओळख
चिपळूण : शाळांमध्ये त्या काळात नाटकासाठी वातावरण नव्हते. हॅम्लेट या नाटकात काम मिळावे, यासाठी प्रयत्न केले. परंतु, संधी मिळाली नाही. मात्र, नववीत असताना गणेशोत्सव कार्यक्रमात पाठीराखण या नाटकात गड्याचं काम मिळालं आणि येथूनच आपला अभिनयाचा प्रवास सुरु झाला, असे मत अभिनेते जयंत सावरकर यांनी येथे व्यक्त केले.
शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात रंगभूमीवरील अनुभवी वाटचालीचा विस्मयकारक कालखंड ही मुलाखत नाटककार सुरेश खरे यांनी घेतली. यावेळी सावरकर बोलत होते. प्रथम जुने मित्र नाना खरे यांच्या हस्ते सावरकर यांचे स्वागत करण्यात आले. गावात त्या काळात इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. त्यामुळे इंग्रजी शिक्षणासाठी १९४४मध्ये भावाकडे शिक्षणासाठी गेलो. त्याकाळी एकत्र कुटुंब पद्धत होती. चांगले शिक्षण घेऊन एखाद्या सरकारी नोकरीला लागावे, अशी वडिलांची इच्छा होती. त्याकाळी आमच्या घरामध्ये कोणीही नाट्यकलावंत नव्हता. पाभरे हे मूळ गाव असून, जन्मगाव गुहागर आहे. नववीत असताना पाठीराखण या चाळीतील नाटकात काम केले. मात्र, अभिनयाचे खरे धडे जुन्या नटांकडूनच शिकलो, असे ते म्हणाले.
मॅट्रिक पास झाल्यानंतर शॉर्ट टायपिंग शिकलो. त्यामुळे सरकारी नोकरी मिळाली. पहिली नोकरी आर्मी सप्लाय डिपार्टमेंटमध्ये केली. शॉर्ट हॅण्ड टायपिंगचा ८ वर्षे अभ्यास केला. ६ डिसेंबर १९५५ मध्ये खऱ्या अर्थाने १९व्या वर्षी नाटकात काम करायला मिळाले. वयाच्या ३१व्या वर्षी नयन तुझे जादुगार हे पहिले नाटक रंगमंचावर केले. पाठांतर शक्ती ही पहिल्यापासूनच आपल्याकडे होती. मात्र, नोकरीत आपले मन रमत नव्हते. त्यानंतर नोकरी सोडली. त्यामुळे आर्थिक ओढाताणही झाली. साहित्य संघातून प्राँटिंगसह जुन्या छोट्या मोठ्या नाटकात काम करु लागलो. त्याकाळी मामा पेंडसे यांची नाटके गाजत असत. त्यांच्याच मुलीशी १९६१मध्ये माझा विवाह झाला. कलावंत म्हणून काही तडजोडी कराव्या लागतात. नाटकातून मिळालेले सगळे पैसे घरी देत असे. मिळालेले पैसे वर्षभर कसे वापरायचे हे आम्ही शिकलो. परिस्थितीने व्यसन करायला सवड दिली नाही. मी आजही निर्व्यसनी राहिलो. बाळ कुरतडकर, नाना फाटक यांच्याकडून अभिनय कसा करायचा, हे शिकलो. आत्माराम भेंडे, दत्ताराम बापू, राम मराठे, कमलाकर नाडकर्णी, शंकर घाणेकर, सुधा करमरकर अशा दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाले. जुन्या नटांकडे शिस्त होती. शिस्त लावण्यासाठी आपला जन्म नाही. परंतु, प्रत्येकाने मान राखून वागावे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)