मडुरा परिसरात आता गव्यांकडून तरव्याची नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:43 PM2019-07-10T14:43:40+5:302019-07-10T14:45:41+5:30
मडुरा परिसरात मगरींची दहशत असताना आता गव्यांनी आपला मोर्चा भात लावणी केलेल्या तरव्याकडे वळविला आहे. गव्यांनी तरव्याची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. मडुरा चवडीवाडी येथील दीपक जाधव, नाना मोरजकर, प्रकाश मोरजकर, प्रकाश पंडित या शेतकऱ्यांच्या शेतीचे यात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता खायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
बांदा : मडुरा परिसरात मगरींची दहशत असताना आता गव्यांनी आपला मोर्चा भात लावणी केलेल्या तरव्याकडे वळविला आहे. गव्यांनी तरव्याची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. मडुरा चवडीवाडी येथील दीपक जाधव, नाना मोरजकर, प्रकाश मोरजकर, प्रकाश पंडित या शेतकऱ्यांच्या शेतीचे यात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता खायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
दिवसेंदिवस मडुरा पंचक्रोशीत गव्यांचा उपद्रव वाढत आहे. तरवा लावणीयोग्य झाला असतानाच गव्यांनी त्याची नासधूस केली आहे. शेतीची नासधूस करणाऱ्या गव्यांविरोधात कोणतीच कार्यवाही केलेली दिसत नाही. वनविभाग फक्त पंचनामा करण्याचे काम करीत आहे. परंतु योग्य ती उपाययोजना कोणी करीत नसल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण? आम्ही शेती तरी कशी करायची? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.
शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे भात पिकविले जाते. परंतु शेतीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या तरव्याचे गव्यांनी नुकसान केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. प्रशासन एकीकडे युवकांना शेतीकडे वळा, असे आवाहन करीत नवनवीन योजना आणताना दिसत आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनाने आधी गव्यांचा बंदोबस्त करावा. नंतरच नवनवीन योजनांची घोषणा करावी,
अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.