निर्धार मताधिक्याचा..गाव दौरा सुसंवादाचा; शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली उद्यापासून अभियान
By सुधीर राणे | Published: January 11, 2024 03:24 PM2024-01-11T15:24:18+5:302024-01-11T15:27:20+5:30
'खासदार विनायक राऊत २ लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होणार'
कणकवली: कणकवली विधानसभा मतदार संघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व युवासेनेच्यावतीने 'निर्धार मताधिक्याचा, गाव दौरा सुसंवादाचा' अभियान शुक्रवार पासून सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून झालेली प्रमुख विकास कामे लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत.
भाजप पक्षात केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांची पत असेल तर त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गलोकसभा मतदार संघात भाजपचा कमळ निशाणीवर उमेदवार द्यावा. त्या उमेदवाराचा पराभव करत २ लाखाच्या मताधिक्क्याने खासदार विनायक राऊत पुन्हा विजयी होतील. असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी येथे व्यक्त केला.
कणकवली येथील विजय भवन येथे गुरुवारी युवा सेनेची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना देवगड तालुकाप्रमुख जयेश नर, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, फरीद काझी आदीसह पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
नाईक म्हणाले, खासदार विनायक राऊत हे आपल्या भुमिकेवर कायमच ठाम राहिले आहेत. मात्र, नितेश राणेंनी नाणारच्या विरोधात विजयदुर्ग, रामेश्वर येथे घंटानाद केला. तसेच प्रारंभी नाणार येथील प्रकल्पाला विरोध दर्शविला. पण त्यांची आता नाणार समर्थनार्थ भूमिका असल्याचा टोला यावेळी लगावला.
कणकवली विधानसभा मतदार संघात मागच्या निवडणूकीत २८ हजाराचे मताधिक्य नितेश राणेंना होते. आता या लोकसभा निवडणूकीत भाजपचे मताधिक्य तोडून खासदार राऊत यांना मताधिक्य मिळवून देणार आहोत. गावागावात जाऊन पदाधिकारी नागरीकांशी संवाद साधणार आहेत. खासदार राऊत यांनी केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवली जाणार आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गट पक्षाचे गावागावात नवीन पदाधिकारी निवडले जातील. उपजिल्हा रुग्णालयात शिवसेनेच्या आंदोलनामुळेच 'सी आर्म मशीन' उपलब्ध झाली आहे. त्याचे फुकटचे श्रेय नितेश राणेंनी घेवू नये असा टोलाही सुशांत नाईक यांनी लगावला.