आमचं ठरलंय..; टोल मुक्त सिंधुदुर्गसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार!, कणकवलीत कृती समितीची बैठक

By सुधीर राणे | Published: December 28, 2022 05:37 PM2022-12-28T17:37:16+5:302022-12-28T17:37:48+5:30

कणकवली: सिंधुदुर्गच्या उपपरिवहन प्रादेशिक विभागाकडे नोंदणी असलेल्या सर्व वाहनांना बिनशर्थ टोलमुक्ती मिळावी. यासाठी सर्वप्रथम सामोपचाराने अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, निवेदने ...

Determined to mount a strong fight for toll free Sindhudurg, Action Committee meeting in Kankavl | आमचं ठरलंय..; टोल मुक्त सिंधुदुर्गसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार!, कणकवलीत कृती समितीची बैठक

आमचं ठरलंय..; टोल मुक्त सिंधुदुर्गसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार!, कणकवलीत कृती समितीची बैठक

googlenewsNext

कणकवली: सिंधुदुर्गच्या उपपरिवहन प्रादेशिक विभागाकडे नोंदणी असलेल्या सर्व वाहनांना बिनशर्थ टोलमुक्ती मिळावी. यासाठी सर्वप्रथम सामोपचाराने अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, निवेदने देणे, न्यायालयीन लढाई  लढणे व त्यानंतर आवश्यकता भासल्यास अहिंसक मार्गाने रस्त्यावरील लढाई करणे. असे सर्वोतोपरी प्रयत्न करीत तीव्र लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. 

तसेच सिंधुदुर्ग पासिंगच्या सर्व वाहनांना बिनशर्थ टोलमुक्ती मिळावी. अथवा ओसरगाव येथील टोलनाका  जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर नेण्यात यावा, असा ठरावही सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ प्रणित टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. हे शक्य नसल्यास सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांसाठी एक स्वतंत्र लेन द्यावी किंवा २० किलोमीटर परिघाची सवलतची मर्यादा ६० किलोमीटर करावी. अन्यथा टोल नाक्याजवळ राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वतंत्र रस्ते तयार करावेत अशी मागणी करण्याचे ठरविण्यात आले.  

टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीची बैठक कणकवली महाविद्यालयाच्या  एचपीसीएल सभागृहात अस्थायी समितीचे अध्यक्ष सतीश लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यापारी महासंघाचे नितीन वाळके, द्वारकानाथ घुर्ये, नंदन वेंगुर्लेकर, अशोक करंबेळकर, दिपक चव्हाण, अॅड. विलास परब, मनोज वालावलकर, दिपक बेलवलकर, निलेश धड़ाम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील विविध संघटना प्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी व इतरांनी मनोगत व्यक्त केले. टोलमुक्त समितीच्या माध्यमातून प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरीही सर्वांनी एकत्रित येत लढण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच रस्त्यासाठी जागा संपादीत करण्यात आलेली आहे, अशा ठिकाणी सर्व्हिस रोड असणे बंधनकारक आहे. मात्र, तशी कार्यवाही झालेली नाही. टोल लागू न करण्याची यावेळी प्रमुख कारणे मांडण्यात आली. यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमुक्त रस्त्याची घोषणा केलेली होती. या महामार्गाचे काम अद्याप सुरू असून ४५ टक्के काम शिल्लक आहे. तसे नसल्यास त्याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. 

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी टोलमुक्तीसाठीचे ठराव घ्यावेत. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत ३ लाख २८ हजार ७११ वाहनांपैकी सुमारे ४० हजारहून अधिक वाहने या टोलवसुलीमुळे अडचणीत येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे. तसे न झाल्यास टोल जिल्ह्याच्या सिमेवर खारेपाटण येथे नेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

यावेळा झालेल्या चर्चेत नितीन वाळके, द्वारकानाथ घुर्ये, मनोज वालावलकर, नंदन वेंगुर्लेकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे नेते अबिद नाईक, अनंत पिळणकर, संजय भोगटे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,  कन्हैया पारकर, राजन नाईक, मनोज रावराणे, अॅड. विलास परब, दादा कुडतरकर, अॅड. किशोर शिरोडकर, रवी तोरसकर, संतोष नाईक, रंजन चिके, दिपक चव्हाण व  इतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी टोल मुक्ती कृती अस्थायी  समितीचे रूपांतर स्थायी समितीत करण्यात आले.त्यामध्ये अजूनही काही सदस्यांचा समावेश करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. 

Web Title: Determined to mount a strong fight for toll free Sindhudurg, Action Committee meeting in Kankavl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.