देवस्थान जमिनींचा १ मार्चपासून सर्व्हे : महेश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 02:42 PM2021-02-18T14:42:20+5:302021-02-18T14:45:32+5:30
Mahesh Jadhav Sindhudurg- देवस्थान समितीच्यावतीने वहिवाटदार व लिलावदार पद्धतीने देण्यात आलेल्या जमिनीचा चुकीचा, गैरवापर करण्यात येत असून, जिल्ह्यातील या जमिनींबाबतचा सर्व्हे १ मार्चपासून सार आयटी समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. यामध्ये चुकीच्या पद्धतीने जमिनीचा वापर करणाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्यात येतील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ : देवस्थान समितीच्यावतीने वहिवाटदार व लिलावदार पद्धतीने देण्यात आलेल्या जमिनीचा चुकीचा, गैरवापर करण्यात येत असून, जिल्ह्यातील या जमिनींबाबतचा सर्व्हे १ मार्चपासून सार आयटी समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. यामध्ये चुकीच्या पद्धतीने जमिनीचा वापर करणाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्यात येतील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव तसेच इतर समिती सदस्य हे तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. कुडाळ येथे मार्गदर्शन मेळाव्याचे समितीच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर महेश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी समितीचे सदस्य राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई, सचिव विजय पवार, कार्यकारी अधिकारी शिवाजी साळवी, शीतल इंगवले, अभियंता सुयश पाटील, देविका जरग पाटील, उत्तम मिटके, बाळकृष्ण ननवरे तसेच जिल्ह्यातील इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी जाधव यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात समितीची १९९ मंदिरे असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. मात्र, अनेक देवस्थान व जमिनींबाबतचे प्रश्न, समस्या आहेत ते ऐकून घेऊन समस्यांचे, प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी समितीचा हा तीन दिवस दौरा आहे.
देवस्थानच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वहिवाटदार व लिलाव पद्धतीने जमिनी देण्यात आलेल्या आहेत. मात्र, जमिनी मिळालेल्या भूधारकांनी मंदिरालाही उत्पन्नातून खर्च, खंड दिला पाहिजे. मात्र, तो दिला जात नाही. तसेच या जमिनीमध्ये पोटकुळे, उपकुळे, भाडेतत्त्वावर देणे असे चुकीचे प्रकार होत आहेत. गैरवापरही केला जात आहे, अशी प्रकरणे दिसून येत आहेत.
अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा
सध्या जिल्ह्यात तीन ठिकाणी जमिनींचा वापर केलेली तीन प्रकरणे निदर्शनास आली आहेत. कोकणात २८ हजार एकर जमीन तर ३८ हजार ४२ मंदिरे समितीकडे आहेत. या जमिनींचा व देवळांचा संपूर्ण सर्व्हे करण्यासाठी सार आयटी या समितीची नियुक्ती करण्यात आली असून, ही समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८३ मुद्यांबाबत १ मार्चपासून अधिकृत सर्व्हे करणार आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावे. जो कोणी द्यायला विरोध करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असाही इशारा जाधव यांनी दिला.