सत्ताधाऱ्यांमुळे विकास ठप्प

By admin | Published: February 10, 2015 10:00 PM2015-02-10T22:00:21+5:302015-02-10T23:57:49+5:30

नारायण राणे यांची टीका : सुंदरवाडी पर्यटन महोत्सवाचा समारोप

Development jam due to power | सत्ताधाऱ्यांमुळे विकास ठप्प

सत्ताधाऱ्यांमुळे विकास ठप्प

Next

सावंतवाडी : सरकारला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. पण सिंधुदुर्गचा विकास ठप्प झाला आहे. आलेला निधी मागे जात आहे. त्यामुळे सर्वांनी विचार करा. एकदा घडाळ्याचा काटा पुढे गेला तर तो मागे येत नाही. तसेच गेलेली वेळ मागे येणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी दिला. ते सुंदरवाडी पर्यटन महोत्सवाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. त्यांनी नाव न घेता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही चांगलीच टीका केली.यावेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष सतिश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती प्रमोद सावंत, गुरू पेडणेकर, तालुकाध्यक्ष संजू परब, अंकुश जाधव, शहराध्यक्ष मंदार नार्वेकर, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून मी घोषित केला. पण आज सिंधुुदुर्गच्या पर्यटनाची अवस्था वाईट झाली आहे. देशात अच्छे दिन येणार अशी नुसती घोषणा झाली मात्र, प्रत्यक्षात काय झाले, असा सवाल करीत सिंधुदुर्गचा विकास शंभर दिवसात ठप्प झाला आहे. सी वर्ल्ड रद्द करण्याच्या विचारात सरकार आहे. वेंगुर्लेकडे जाणाऱ्या पाईपलाईनचे काम बंद झाले आहे. विमानतळ तसेच दोडामार्ग एमआयडीसीला निधी दिला नाही, अशी अनेक कामे थांबली आहेत. मग याला विकास कसा म्हणायचा, असा सवाल करत पर्यटन महोत्सव आम्ही साजरे करतो ते येथील जनतेला सुखाचे दिवस दिसावेत यासाठीच. पंचवीस वर्षात सावंतवाडीचा काय विकास झाला आहे. याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असून तसे न झाल्यास भविष्यात याहून वाईट अवस्था जिल्ह्याची होईल. त्यामुळे घडाळ्याचा काटा जसा मागे फिरत नाही तशी गेलेली वेळही मागे फिरत नाही. याचा प्रत्येकाने अंदाज बांधा, असेही राणे यांनी सांगितले.
यावेळी आमदार नीतेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जे सरकार मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना नोटीसा काढते आणि त्यांना सिंधुदुर्ग महोत्सवास हजर राहण्यास सांगते. एवढी दुर्दैवी परिस्थिती का यावी, असा सवाल करत पर्यटन जिल्हा जाहीर करण्यात माजी मुख्यमंत्री राणे यांचा वाटा मोठा असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे महोत्सव करावा तर राणे यांनीच हे सांगायला ते विसरले नाहीत.
या महोत्सवाच्या निमित्ताने नूतन आमदार नीतेश राणे यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. तर सावंतवाडी तालुक्याच्यावतीने नारायण राणे यांचा सत्कार संजू परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. यावेळी समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, चित्रकार दादा मालवणकर, निवृत्त मेजर रामा रूपा सावंत, कवयित्री कल्पना बांदेकर, आबा धारगळकर, डॉ. लिना परूळेकर, छायाचित्रकार अनिल भिसे, प्रसिद्ध चित्रकार एस. बी. पोलाजी, दिव्या सावंत, चित्रकार अनिल ठोबरे आदींचा यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)


नारायण राणेंचा विश्वास सार्थ केला
सावंतवाडीत सुंदरवाडी महोत्सव घ्यावा, हे आम्ही ठरवले होते. त्याला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाठबळ दिले. तर माजी खासदार नीलेश राणे यांचे सहकार्य लाभले. त्यामुळेच एवढा मोठा कार्यक्रम घेऊ शकलो, असेही यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी सांगत राणे यांचा विश्वास सार्थ केला याचाच अभिमान वाटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Development jam due to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.