कणकवलीचा ब्ल्यू प्रिंटनुसार विकास सुरु

By admin | Published: March 30, 2016 10:38 PM2016-03-30T22:38:29+5:302016-03-30T23:51:45+5:30

नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांची माहिती : आम्ही जनतेचे सेवक, शहरात कोट्यवधीची विकास कामे

Development of Kankavali's Blue Prints | कणकवलीचा ब्ल्यू प्रिंटनुसार विकास सुरु

कणकवलीचा ब्ल्यू प्रिंटनुसार विकास सुरु

Next

कणकवली : कणकवली नगरपंचायतीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या १५0 दिवसात अनेक विकास कामे आम्ही मार्गी लावली आहेत. शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आम्ही मनात तयार केली असून त्यादृष्टीने काम सुरु आहे. जनतेचे मालक न होता सेवक बनूनच यापुढेही आम्ही काम करीत राहणार असल्याचे नगराध्यक्षा माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत येथे संगितले.
येथील नगरपंचायतीच्या कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर, विरोधी पक्ष नेत्या राजश्री धुमाळे, नगरसेवक सुशांत नाईक, नंदिनी धुमाळे, प्रा. दिवाकर मुरकर उपस्थित होते.
नगराध्यक्षा माधुरी गायकवाड म्हणाल्या, शहरवासीयांकडून नुसते कर न घेता त्यांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहरातील २८ रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे बाजारपेठ, तेलीआळी, जानवली नदीवरील गणपती सान्यापर्यंत जाणारा रस्ता या तीन रस्त्याची कामे दर्जेदाररित्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे रस्ते पुढील काळात आदर्श मॉडेल म्हणून शहरवासियांसमोर असतील. त्याच धर्तीवर अन्य रस्ते बनविण्यात येतील. बीटीमीन्स पध्दत हे रस्ते बनविताना वापरण्यात येणार आहे.
नगरोत्थान अभियानामधुन शहरासाठी यावर्षी ५ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीअंतर्गत पाठविण्यात आलेल्या कामाच्या प्रस्तावाना मंजुरी मिळाली आहे. ही कामे अल्पावधितच सुरु होतील. संपूर्ण शहराचा विचार करून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा चांगल्यारीतीने होऊ शकेल यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जॅकवेलचा १५ वर्षाचा कालावधी असून आता १३ वर्षे झाली आहेत. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा करताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाईपलाईन बदलण्यात येणार आहेत. तर जास्त क्षमतेचे दोन पंप ही बसविण्यात येणार आहेत.
या अद्ययावत पंपामुळे पाणी उपसा करण्याचा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे विज देयक ही कमी येणार आहे. नागरिकांनी अर्ज केल्यावर लगेचच त्यांना नळ कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून जानवली नदीवरील गणपती साना पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणार आहे. त्याठिकाणी सरंक्षक भिंत उभारण्याबरोबरच सी.सी.टी.व्ही. ही बसविण्यात येईल. तसेच संपूर्ण परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
कचराविरहित रस्ता व शहर बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन संकुल बांधण्यास परवानगी देताना सांडपाणी फिल्टरेशन प्लांट बसविणे, कचरा व्यवस्थापन करणे या अटी घालूनच परवानगी देण्यात यावी असे मुख्याध्याकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने काळजी घेण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज उद्यान उभारण्यात येणार असून जॉगिंग ट्रॅक सारख्या सुविधा निर्माण करण्यात येतील.
यासाठी कांबळेगल्ली येथील आरक्षण विकसित केले जाणार आहे. शहर विकासासाठी आतापर्यंत विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक तसेच नागरिकांचे चांगले सहकार्य लाभले असल्याचे कन्हैया पारकर यांनी शेवटी
सांगितले. (वार्ताहर)

जागा द्या ! पैसे देऊ !
शहरातील विकास कामासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. विकास कामासाठी जागा द्या ! आम्ही पैसे देऊ ! हे आमचे धोरण आहे. जागा उपलब्ध करून देणाऱ्यांना नगरपंचायतीच्या माध्यमातून मोबदला देण्याची जबाबदारी आमची आहे, असे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी यावेळी सांगितले.
शहराचा विकास जलदगतीने सुरु !
आमचे मार्गदर्शक संदेश पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोणाचाही राजकीय वरदहस्त नसताना चांगले काम सुरु आहे. यापूर्वी संदेश पारकर यांच्या हाती नगरपंचायतीची सत्ता आल्यानंतर त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली होती. त्याहूनही अधिक कामे आता अल्पावधित आम्ही केली आहेत. शहराचा विकास जलदगतीने सुरु आहे, असे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी सांगितले.
पालकमंत्री तसेच शासनाचे आभार !
कणकवलीच्या विकासासाठी युती शासनाने तसेच पालकमंत्र्यानी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कणकवलीच्या इतिहासात प्रथमच एवढा निधी उपलब्ध झाला असेल. त्यामुळे त्यांचे आभार मानत असल्याचे नगरसेवक सुशांत नाईक व राजश्री धुमाळे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Development of Kankavali's Blue Prints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.