कोकणचा विकास करणार : केसरकर

By admin | Published: December 13, 2014 11:50 PM2014-12-13T23:50:41+5:302014-12-13T23:50:41+5:30

सिंधुदुर्गात भव्य स्वागत : दोडामार्गचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार

Development of Konkan: Kejarkar | कोकणचा विकास करणार : केसरकर

कोकणचा विकास करणार : केसरकर

Next

कसई दोडामार्ग : प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यातूनच कोकणचा विकास करणार आहे. मंत्रिपद मिळाल्याचा पुरेपूर फायदा कोकणला करून देणार आहे. तुमच्या मेहनतीमुळेच मी आमदार व मंत्री झालो. त्याची परतफेड सर्वांना प्रेम देऊन आणि कोकणचा खऱ्या अर्थाने विकास करूनच करीन, असे प्रतिपादन वित्त, ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथील शासकीय दौऱ्यावेळी केले.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केसरकरांचे आज, शनिवारी पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आगमन झाले. दोडामार्ग येथे पंचायत समितीच्यावतीने महालक्ष्मी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, सभापती महेश गवस, जिल्हा परिषद सदस्य विशाखा देसाई, तहसीलदार बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, पांडुरंग नाईक, रंगनाथ गवस, यशवंत आठलेकर, विजयकुमार मराठे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद दौऱ्याचे आयोजन करून समस्या जाणून घेतल्या. या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अधिवेशन संपताच तिन्ही तालुक्यांतील जिल्हा परिषद मतदारसंघात दौरा करून प्रत्येक नागरिकाच्या समस्या, प्रश्न यांची माहिती घेऊन सोडविणार, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री केसरकर यांचे तालुक्यात आगमन होताच शिवसैनिक, भाजप, आरपीआय व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी गांधी चौक येथे गर्दी झाल्याने काही वेळ वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.
प्रकल्पग्रस्तांसाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार
दोडामार्ग तालुका अतिदुर्गम आहे, विकासापासून दूर आहे. याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. घारपी, कुंभवडे, तेरवण, भेकुर्ली ही गावे अतिदुर्गम आहेत. कुंभवडे गाव चौकुळ ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी व तेरवण गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत, अन्य ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणार, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

Web Title: Development of Konkan: Kejarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.