नरेंद्र उद्यानाचा कायापालट होणार, उद्यानात एलईडी लाईट, निरीक्षण मनोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:23 PM2019-06-01T18:23:42+5:302019-06-01T18:25:36+5:30
सावंतवाडीतील संस्थानकालीन नरेंद्र डोंगरावरील वन उद्यानाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून, उद्यानात एलईडी लाईट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यानात पर्यटकांसाठी पॅगोडा म्हणजेच निरीक्षण कुटी तसेच बसण्यासाठी बेंच आदी वस्तू ठेवण्यात येणार आहेत. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्यासह वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांनी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करून याबाबतचा आराखडा तयार केला आहे. तसेच काही कामे सुरूही करण्यात आली आहेत.
सावंतवाडी : सावंतवाडीतील संस्थानकालीन नरेंद्र डोंगरावरील वन उद्यानाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून, उद्यानात एलईडी लाईट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यानात पर्यटकांसाठी पॅगोडा म्हणजेच निरीक्षण कुटी तसेच बसण्यासाठी बेंच आदी वस्तू ठेवण्यात येणार आहेत. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्यासह वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांनी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करून याबाबतचा आराखडा तयार केला आहे. तसेच काही कामे सुरूही करण्यात आली आहेत.
सावंतवाडी शहरापासून काही अंतरावर नरेंद्र डोंगर असून, याच डोंंगराच्या वरच्या बाजूला संस्थानकालीन वनउद्यान आहे. या वनउद्यानाला लागून असलेले मळगाव माजगाव येथील रस्ते आता पूर्ण झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने आता पुढचे पाऊल टाकले असून, नरेंद्र डोगरांला लागून असलेल्या मुख्य रस्त्याला पर्यटन प्रकल्प जोडण्यात येणार आहे. आता नरेंद्र डोगरावर असलेल्या वनउद्यानाचे रूप पालटणार असून, विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुतर्फा एलईडी लाईट्स लावण्यात आली असल्यामुळे हा परिसर रात्रीसुद्धा उजळून निघाला आहे.
नरेंद्र डोंगराने कुशीत घेतलेल्या सावंतवाडी शहराला या पर्यटन प्रकल्पामुळे अधिकाधिक पर्यटक शहरामध्ये दाखल होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वनविभागाच्या या वाईल्ड नेसच्या धर्तीवरील पर्यटन प्रकल्पामध्ये निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात येणार आहे. याशिवाय पर्यटकांसाठी स्वागत कक्षही उभारण्यात येणार आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावरील गेट उभारण्यात येणार आहे. नरेंद्र उद्यानाच्या माथ्यावर रस्त्याच्या कडेने पॅगोडा आणि निरीक्षण कुटीकडे जाणाऱ्या वाटांच्या दुतर्फा एलईडी लाईट लावण्यात आल्या आहेत. या कामाची पाहणी उपवनसंरक्षक चव्हाण यांनी केली.
राज्य शासनाच्या चांदा ते बांदा या योजनेंतर्गत नरेंद्र उद्यान पर्यटन प्रकल्पासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून एक कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे त्यामुळे सावंतवाडी शहरांमध्ये पर्यटक येतील आणि ते वनविभागाच्या वन उद्यान व निवासी पॅगोडामध्ये निसर्गासोबत पर्यटनाचा आनंद अनुभव देतील असा विश्वास सिंधुदुर्गचे वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
नरेंद्र डोंगर माथ्यावर जाण्यासाठी फोर व्हील ड्राईव्ह
विशेष म्हणजे या पर्यटकांना नरेंद्र डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी फोर व्हील ड्राईव्ह ठेवण्यात येणार आहे. यातून पर्यटक निसर्गाच्या जवळ जातील, काही क्षण तेथे निसर्गासोबत हितगूज करतील. परतीच्या प्रवासासाठीसुद्धा फोर व्हील ड्राईव्हच्या गाड्या त्यांना सावंतवाडी मळगाव घाटीकडे जाणाºया डिके टुरिझम येथे पर्यटकांना सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नरेंद्र डोंगर पर्यटनासाठी जाणाºया पर्यटकांना वनवे निसर्ग पर्यटन प्रवास करावा लागणार आहे. पर्यटकांना वाहन पार्किंगसाठी खासगी जमीन भाडेतत्त्वावर घेण्याचाही विचार वनविभागाने सुरू केली असून त्यादृष्टीने चाचपणी सुरू असल्याचे उपवनसंरक्षक चव्हाण यांनी सांगितले.
एक कोटीचा निधी खर्च
नरेंद्र डोगरांतील उद्यानावर पर्यटना अंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरापासून ते थेट नरेंद्र डोंगराच्या माथ्यावर असलेल्या वनजमिनीत निसर्ग परिसर केंद्रासह उडन हाऊस प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पामध्ये पर्यटकांना निसर्ग निरीक्षणासाठी ३ पॅगोडा उभारण्याचे काम सुरू आहे.
या पॅगोडाना निरीक्षण कुटी असे वनविभागाने नाव दिले आहे याशिवाय ५ उडन हाऊस उभारण्यात येणार आहेत. निसर्गाच्या सानिध्यात त्यामध्ये राहून पर्यटकांना निसर्गाची जवळीक साधण्यासाठी हा नरेंद्र उद्यान पर्यटन प्रकल्प सुरू होत करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. निसर्ग पर्यटनासाठी नरेंद्र डोंगर उद्यान सज्ज झाले असल्याचेही ते म्हणाले.