पर्यटन प्रकल्पांचा ‘लघु’ महामंडळामार्फत विकास

By admin | Published: July 10, 2016 11:54 PM2016-07-10T23:54:03+5:302016-07-10T23:54:03+5:30

दीपक केसरकर : शिल्पग्राम, रघुनाथ मार्केटचा प्रश्न निकाली

Development through 'Small' Corporation of Tourism Projects | पर्यटन प्रकल्पांचा ‘लघु’ महामंडळामार्फत विकास

पर्यटन प्रकल्पांचा ‘लघु’ महामंडळामार्फत विकास

Next

सावंतवाडी : शिल्पग्राम व रघुनाथ मार्केट हे प्रकल्प लवकरच महाराष्ट्र लघु उद्योग विकास कला व कौशल्य महामंडळाकडे सुपूर्द करण्यात येणार असून, त्याअंतर्गत त्यांचा विकास होणार आहे. दोन महिन्यात हे प्रकल्प सुरु होणार असल्याची माहिती अर्थ व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यामुळे कित्येक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पांना ऊर्जितावस्था येणार असून, पर्यटनासह येथील बाजारपेठेचे महत्त्व वाढणार आहे.
उभाबाजार येथील रघुनाथ मार्केट व शिल्पग्राम या दोन्ही प्रकल्पांची केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास कला व कौशल्य महामंडळाच्या सहाय्यक व्यवस्थापिका आर. के. विमला, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रकाश परब, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम आदी उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर यांनी दोन्ही प्रकल्पांची पाहणी केली तसेच महामंडळाच्या व्यवस्थापिका आर. के. विमला यांना प्रकल्पविषयी व आजुबाजूच्या परिसरातील सविस्तर माहिती दिली.
सावंतवाडीत केरळच्या धर्तीवर क्वॉयर प्रकल्प राबविण्यात येणार असून, यासाठी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या विविध हस्तकला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच महिलांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंना केरळसारखी आवश्यक बाजारपेठही मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, महिलांनी त्याचा लाभ उठविण्याचे आवाहनही केसरकर यांनी केले.
रघुनाथ मार्केट व शिल्पग्राम पुन्हा विकसित होण्यासाठी हे प्रकल्प महाराष्ट्र लघु उद्योग विकास कला व कौशल्य महामंडळाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्याच धर्तीवर या प्रकल्पांचा विकास होणार आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या आत गणेश चतुर्थीपूर्वी दोन्ही प्रकल्प सुरु होणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी संगितले. रघुनाथ मार्केटचा जेव्हा विकास होईल त्यावेळी सावंतवाडी सुजलाम सुफलाम होईल, असा आशावादही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
आर. के. विमला म्हणाल्या, केरळमध्ये काथ्या प्रकल्पाचे ७३४८ युनीट आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात हा आकडा पंधरापेक्षा वर गेला नाही. जिल्ह्यात केवळ आणि केवळ हे दोनच युनीट आहेत. त्यामुळे काथ्या व्यवसायाला जिल्ह्यात चालना मिळू शकते. सध्या केरळसारख्या मोठ्या बाजारपेठेत काथ्याची मागणी होत असून, त्यासाठी काथ्या निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. महिलांनी याचा लाभ घेत घरबसल्या प्रगती करावी. शिवाय या प्रकल्पांसाठी आवश्यक असे प्रशिक्षण येत्या पंधरवड्यात देण्यात येणार असून त्याचाही लाभ महिलांनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शिल्पग्रामसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर करून पालकमंत्र्यांनी शहराच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली आहे. आगामी काळात शहरात अनेक विकासात्मक प्रकल्पातून शहराचा सर्वांगिण विकास होणार असून सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे, असे सांगितले.
यावेळी सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका अनारोजीन लोबो यांचे पती जॉन लोबो यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांना पालकमंत्री दीपक केसरकरांसह मान्यवरांनी श्रद्धांजली
वाहिली. (वार्ताहर)
प्रकल्पांना ऊर्जितावस्थ : पर्यटनाला संधी मिळणार
सावंतवाडी शहरात पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत अनेक प्रकल्प बंदावस्थेत आहेत. त्यामुळे शहराच्या पर्यटनावर परिणाम झाला होता. मात्र, एकंदरित आजच्या निर्णयामुळे रघुनाथ मार्केट व शिल्पग्राम दोन्ही प्रकल्पांना ऊर्जितावस्था मिळणार असल्याने पर्यटनाला संधी निर्माण झाली आहे.
पाच कोटीची मंजुरी
महिलांना लघु उद्योग विकास महामंडळामार्फत रोजगारासाठी चांदा ते बांदाच्या योजनेतून पाच कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. याअतंर्गत सुरूवातीला सावंतवाडी शहरातील किमान ५० महिलांना यातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर वेंगुर्ले व दोडामार्गात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

Web Title: Development through 'Small' Corporation of Tourism Projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.