ग्राम पर्यटनानेच विकास शक्य
By admin | Published: September 27, 2016 09:53 PM2016-09-27T21:53:53+5:302016-09-28T00:44:39+5:30
खेमसावंत भोसले : माजगाव येथे जागतिक पर्यटन दिन साजरा
सावंतवाडी : पर्यटन क्षेत्राचा ग्रामीण पर्यटन हा मूळ गाभा असून, ग्रामीण भागातील लोकांना एकत्रित करून कृषी व ग्राम पर्यटनाचा विकास झाला, तरच खऱ्या अर्थाने जिल्हा पर्यटन विकासात आघाडीवर राहील, असे मत राजे खेमसावंत भोसले यांनी व्यक्त केले.
माजगाव येथे द्वारका कृष्ण पर्यटन विकास व सेवा सहकारी संस्थेतर्फे जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राजमाता सत्वशीलादेवी भोसले, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र फाटक, ‘रात्रीस खेळ चाले’चे दिग्दर्शक राजू सावंत, अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, अध्यक्ष डी. के. सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा सावंत, भाई देऊलकर, आबा सावंत, नकुल पार्सेकर, बाळासाहेब परुळेकर, आदी उपस्थित होते.
यावेळी खेमसावंत भोसले म्हणाले, ग्रामीण विकास हे पर्यटन क्षेत्राचे मूळ आहे. पर्यटनाचा विकास हा गावातूनच झाला पाहिजे. तरच नवनवीन पर्यटन क्षेत्रे तयार होतील. रोजगारांची साधने उपलब्ध होणार असून, ‘मामाचा गाव’ हा खरा चांगला उपक्रम पुन्हा एकदा सुरू व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. गावातील रस्ते चांगले असतील तरच पर्यटक येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
४0 रिक्षास्वारांचा सत्कार
अध्यक्ष डी. के. सावंत म्हणाले, २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. मात्र, त्याचा प्रत्यक्षात आराखडाच कुठे दिसत नाही. आजही महत्त्वाच्या ठिकाणी शौचालये नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सावंतवाडीतील ४० रिक्षास्वारांचा सत्कार करण्यात आला. तसेच पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
‘रात्रीस खेळ चाले’मुळे रोजगार मिळाला : प्रल्हाद कुडतरकर
अभिनेता प्रल्हाद कुडतरकर म्हणाला, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ््या चित्रपटांचे, तसेच मालिकांचे चित्रीकरण झाले, तर मोठ्या प्रमाणात अनेक कलाकार जिल्ह्यात येतील. त्यामुळे येथील पर्यटनाची सर्वांना माहिती होईल. आपण ते करणे गरजेचे आहे. येथील पर्यटनाला लागणाऱ्या सुविधा चांगल्या ठेवल्या, तर गावातही चित्रीकरण होईल, असेही त्यांनी सांगितले. ‘रात्रीस खेळ चाले’मुळे अनेकांना रोजगार मिळाला. तसेच या मालिकेमुळे सर्वांना सिंधुदुर्गबद्दल एक वेगळी छाप पडली. त्याचा फायदाही येथील लोकांना होईल. अनेक पर्यटक भविष्यात सिंधुदुर्गमध्ये येतील, असेही यावेळी कुडतरकर म्हणाले.