खेड्यांचा विकास, शेतकऱ्यांचे कल्याण हेच ध्येय
By admin | Published: February 9, 2015 09:20 PM2015-02-09T21:20:27+5:302015-02-10T00:26:28+5:30
प्रमोद जठार : मांगवली ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन
वैभववाडी : जनतेच्या उत्कर्षासाठी सरकार चालविताना ज्याच्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास होईल ते सर्व करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे खेड्यांचा विकास आणि शेतकऱ्यांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी मांगवली येथे ग्रामसचिवालयाच्या भूमिपूजन समारंभात केले. हा समारंभ शनिवारी पार पडला.
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ग्रामसचिवालयासाठी २५ लाख रुपये खासदार निधी दिला आहे. ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, सरपंच राजेंद्र राणे, कोकण विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधर राणे, उपसरपंच सखाराम राणे, ग्रामविकास मंडळाचे सुरेश राणे, दत्ता गुरव, भास्कर संसारे, महेश संसारे, ग्रामसेवक उमेश राठोड, दिगंबर भागवत, संतोष इस्वलकर, पोलीसपाटील तानाजी आयरे, सुरेश आयरे, प्रज्ञा लिंगायत, हर्षदा संसारे, शारदा कांबळे, सुवर्णा लोकम, आदी उपस्थित होते.
जठार म्हणाले, कोट्यवधीच्या कर्जातून मार्ग काढत फडणवीस सरकारने काम करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची मुले सुखी व्हावीत, त्यांना रोजगार मिळावा, उद्योग- व्यवसायाला बळ देण्याच्यादृष्टीने सरकारची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मी आमदार नसलो तरी सरकार आपले आहे. त्यामुळे विकासाचा एकही प्रश्न आम्ही शिल्लक ठेवणार नाही. मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २५ लाख रुपयांचा निधी एका प्रयत्नात मांगवलीला दिला, हे ग्रामस्थांचे भाग्य आहे. ग्रामसचिवालयाचे उद्घाटन जावडेकर यांच्याच हस्ते होईल, असे म्हणाले.अतुल काळसेकर म्हणाले, आधीचे सरकार फक्त निवेदने घेत होते. निर्णय घेण्याची धमक त्यांच्यात नव्हती. त्यामुळेच १५ वर्षांत जिल्ह्याच्या विकासाची प्रक्रियाच कोलमडून पडली. मात्र, महायुतीचे सरकार जनहिताचे धाडसी निर्णय घेऊन कल्पकता दाखवत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट करतानाच मंत्री जावडेकर यांचे मूळ गाव म्हणून विकासाची गंगा मांगवलीपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे म्हणाले.
यावेळी दत्ता गुरव, श्रीधर राणे, महेश संसारे यांनी विचार मांडले. सरपंच राजेंद्र राणे यांनी प्रास्ताविकात ग्रामविकासाचा आढावा मांडला. शरद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद जावडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तुम्ही मित्र व्हा
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनावेळी शरद कांबळे यांनी प्रमोद रावराणेंचा उल्लेख ‘आमचे मित्र’ असा केला. तो संदर्भ देत रावराणे यांनी, कांबळे आमचे आता मित्र झालेत, पूर्वी नव्हते. परंतु, केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे. त्यामुळे तुम्ही आमचे मित्र व्हा, अशी आॅफर महेश संसारे यांना दिली. यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांनी या आॅफरला दाद दिली.