कार्यकर्त्यांचा विकास म्हणजे जनतेचा विकास नव्हे
By admin | Published: July 6, 2016 11:01 PM2016-07-06T23:01:01+5:302016-07-07T00:51:31+5:30
वैभव नाईक यांचा टोला : देवगड येथे शिवबंधन कार्यक्रम
देवगड : वडिलांचा जेथे पराभव करायला आम्हाला वेळ लागला नाही तेथे मुलाचा पराभव करण्यासाठी शिवसेनेला कष्ट करावे लागणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन करतानाच ज्यांना मागील पंचवीस वर्षे जिल्ह्याचा विकास जमला नाही त्यांनी आमच्या दीड वर्षाच्या कालावधीचा आम्हाला हिशेब विचारू नये. कार्यकर्त्यांचा विकास म्हणजे जनतेचा विकास नाही. शिवसेना मात्र जनतेचाच विकास करीत राहणार आहे, असे मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले.
शिवसेनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देवगड येथे शिवबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुभाष मयेकर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, हर्षद गावडे, वर्षा पवार, दादा पडेलकर आदी उपस्थित होते. मेळाव्यात पक्षाची मागील ५० वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला.
नाईक म्हणाले, युतीशासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये संघटनात्मक बांधणीबरोबर ही विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून विश्वास संपादन केला पाहिजे. आगामी काळात हा सर्व भाग शिवसेनामय दिसेल. पक्षातील तरुणांनी नव्या उमेदीने काम करायला हवे. शिवसेनेने आजवर सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले आहे. जेथे वडिलांचा पराभव केला तेथे मुलाचा पराभव करायला शिवसेनेला वेळ लागणार नाही. पालकमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास सुरू आहे.
पर्यटन, रस्ते विकास यासह मच्छिमारांचे प्रश्न सोडवले जात आहेत. मात्र, मागील पंचवीस वर्षांत काहीही विकास न करणाऱ्यांनी आमच्याकडे दीड वर्षातील हिशोब विचारू नये. शिवसेना लोकांच्या कामासाठी सक्रिय व सक्षम आहे. काँग्रेसची स्थापना कोणी केली हे त्यांच्या तालुकाध्यक्षांना तरी माहिती आहे का? असा प्रश्न विचारत मराठी माणसाने निर्माण केलेल्या संघटनेच्या मागे जनता असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)