देवगड हापूस आंबा : रोज ५ हजार पेट्या वाशी मार्केटला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:25 AM2019-04-01T11:25:43+5:302019-04-01T11:28:43+5:30
देवगड तालुक्यामधून देवगड हापूस आंब्याच्या सुमारे ५ हजार पेट्या दररोज वाशी मार्केटला रवाना होत आहेत. अचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात देवगड हापूस आंबा उपलब्ध झाला आहे.
देवगड : तालुक्यामधून देवगड हापूस आंब्याच्या सुमारे ५ हजार पेट्या दररोज वाशी मार्केटला रवाना होत आहेत. अचानक उष्णता वाढल्याने आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात देवगड हापूस आंबा उपलब्ध झाला आहे.
सध्या चारशे ते बाराशे रुपये प्रति डझनाने आंबा स्थानिक बाजारेपठामध्ये विकला जात आहे. तर वाशी मार्केटमधील पाच डझनी पेटीच्या आंब्याला तीन ते साडेतीन हजार रुपये भाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावर्षी देवगड हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत विक्रमी असा बहारदार मोहोर देवगड हापूस आंबा कलमांना आला होता. मात्र थ्रीप्स रोगाने थैमान घातल्याने बहुतांशी कमी प्रमाणात आंबा पिक झाले आहे.
सध्या देवगड तालुक्यामधून सुमारे पाच हजार हापूस आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटला नेहमी रवाना होत आहेत. या हापूस आंब्याच्या पाच डझन पेटीला सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे.
याच दर्जाचा आंबा स्थानिक बाजारपेठांमध्ये आठशे ते हजार रुपये डझनने विकला जात आहे. यावरुन वाशी मार्केटमधील आंबा पेटीचा भाव व स्थानिक बाजारपेठामधील आंबा पेटीचा भाव यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत जाणवत आहे. यामध्ये स्पष्ट दिसून येते की, वाशी मार्केटमधील दलालांची मक्तेदारी व बागायतदारांची होत असलेली पिळवणूक वाढत चालली आहे.
यावर्षी मार्च महिन्याच्या २२ तारीखेपर्यंत थंडी टिकून राहिल्याने बहुतांश आंबा या थंडी व थ्रिप्सचा प्रार्दुभाव वाढल्याने आंबा गळून पडला होता. मात्र २३ मार्च पासून थंडी गायब होऊन उष्णता वाढल्याने खऱ्या अर्थाने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.
उष्णतेमुळे थ्रीप्स रोग संपुष्टाता आला असून आंबाही तयार होण्यास पोषक वातारण निर्माण झाले आहे. देवगड तालुक्यातील बागायतदारांनी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणीही भाडे तत्वावरती स्टॉल घेऊन देवगड हापूसची आंबा विक्री सुरु केली आहे. त्याही ठिकाणी चांगला भाव बागायतदारांना मिळत आहे.
थ्रीप्स रोगाने शेवटच्या टप्प्यातील मोहोराचे नुकसान
डिसेंबर महिन्यामध्ये आलेल्या मोहोराला चांगल्या प्रकारे फळधारणा झाली होती. त्याच मोहोराचे फळ टिकले आहे. मात्र अखेरच्या टप्यातील फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेल्या मोहोरावरती चांगल्याप्रकारे फळधारणा झाली होती. मात्र थ्रीप्स या रोगाने शेवटच्या टप्यातील आलेल्या मोहोराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे शेवटच्या टप्यातील म्हणजेच मे महिन्यातील हापूस आंबा कमी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.