देवगड हापूस आंब्याच्या मोहरावर आता फळमाशीचे नवे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:42 PM2022-11-21T13:42:13+5:302022-11-21T13:42:39+5:30
फळमाशीवर वेळीच संशोधन होऊन कृषी विभागाने लक्ष देऊन औषधांचे संशोधन करणे गरजेचे
अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : देवगड हापूस आंब्यावर नवीन येणारी संकटे आणि त्यामधील कृषी विभागाचा नाकर्तेपणा आंबा बागायतदारांच्या मुळाशी येऊन ठेपला आहे. आंबा मोहरावर २० वर्षांपूर्वी खार या चिकट द्रव्याने थैमान घालून आंबा मोहराचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले होते. यानंतर थ्रीप्सने बागायतदारांना हतबल केले होते. या दोन्ही रोगांवर नवनवीन औषधे आल्याने ते नियंत्रणामध्ये आले. मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे फळमाशीचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे आंबा बागायतदारांसमोर नवीन संकटच उभे राहिले आहे.
अनेक प्रकारच्या रोगामुळेच महागडी कीटकनाशके बागायतदारांना फवारणी करावी लागत होती. यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था आंबा बागायतदारांची थ्रीप्स या रोगाने केली होती. आता थ्रीप्सवर देखील अनेक औषधे निर्माण झाल्याने हा रोग आटोक्यात येत असताना पुन्हा आंबा बागायतदारांसमोर फळमाशी हे मोठे संकट गेल्यावर्षीपासून उभे येऊन ठेपले आहे. या फळमाशीचा याहीवर्षी प्रादुर्भाव निर्माण झाला तर कोणती औषधे कृषी विभागाकडून संशोधन करून निर्माण केली जातात. याकडे बागायतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
वेळीच संशोधन करणे गरजेचे
फळमाशी ही अवकाळी पावसामुळे निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी मोहर आल्यानंतर डिसेंबर ते मार्च महिन्यांमध्ये अधूनमधून अवकाळी पाऊस पडत राहिल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला होता. या फळमाशीवर वेळीच संशोधन होऊन कृषी विभागाने लक्ष देऊन औषधांचे संशोधन करणे गरजेचे आहे. या फळमाशीचा आंबा पिकाबरोबर केळी, चिकू व अन्य फळांवर देवगड तालुक्यामध्ये परिणाम दिसून आला होता. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देणे गरजेेचे आहे.
कोकणातील बागायतदार देताहेत एकाकी झुंज
खार, थ्रीप्स या आंबा पीक नष्ट करणाऱ्या रोगानंतर फळमाशीचे संकट आंबा बागायतदारांसमोर येऊन ठेपले असताना याकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे कोकणातील बागायतदारांना एकाकी झुंज द्यावी लागत आहे. आंबा बागायतदारांचे प्रश्न विधानसभेमध्ये चर्चिले जाणे महत्त्वाचे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच कोकणातील शेतकऱ्यांना कमी पडत आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या बाजूने तेथील लोकप्रतिनिधी नेहमीच उभे राहतात.
देवगड तालुक्यामध्ये विजयदुर्ग, गिर्ये येथे कोकण कृषी विद्यापीठाचे रामेश्वर फळ संशोधन उपकेंद्र आहे. मात्र, या संशोधन केंद्राच्या माध्यमातून बागायतदारांच्या फळांवर येणाऱ्या रोगांचे संशोधनच केले जात नाही. त्यामुळे दिखावूपणामध्ये असलेले फळसंशोधन केंद्र शेतकऱ्यांचे हित जोपासत नसेल तर हे केंद्र शोभेचेच कित्येक वर्षापासून ठरत आहे