देवगड जामसंडे नगरपंचायत स्वीकृत नगरसेवकपदी विश्वमित्र खडपकर
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 20, 2023 04:07 PM2023-12-20T16:07:03+5:302023-12-20T16:07:44+5:30
देवगड ( सिंधुदुर्ग ) : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विश्वमित्र चंद्रकांत खडपकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची ...
देवगड (सिंधुदुर्ग) : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विश्वमित्र चंद्रकांत खडपकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची विशेष सभा बुधवारी पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात झाली.
देवगड जामसंडे नगर विकास समिती या गटातील नामनिर्देशित सदस्य रवींद्र प्रभाकर चिंदरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने जागा रिक्त होती. या जागी नूतन नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच देवगड जामसंडे नगरपंचायतचे मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या विशेष सभेत नगर विकास समिती गटाचे गटनेते शरद ठुकरुल यांनी नामनिर्देशपदासाठी विश्वमित्र खडपकर यांचा एकमेव अर्ज सादर केला.
त्यासाठी नावाचे शिफारस पत्र सादर केले. नामनिर्देशनपत्र वैध असल्याचे घोषित केले. प्राप्त झालेले विश्वमित्र चंद्रकांत खडककर यांचे नामनिर्देशनपत्र वैध असल्यामुळे विश्वमित्र चंद्रकांत खडपकर यांचे देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती झाल्याची पीठासन अधिकारी यांनी घोषित केले.
निवड जाहीर होताच माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य बाळ खडपे, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, गटनेते शरद ठुकरुल, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, प्रदीप साळसकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, अन्य सर्व नगरसेवक नगरसेविका भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचे कौतुक केले.