देवगड, मालवणला पावसाने झोडपले

By Admin | Published: June 23, 2016 12:32 AM2016-06-23T00:32:03+5:302016-06-23T01:10:57+5:30

मान्सून सक्रिय : समुद्राला उधाणसदृश परिस्थिती

Devgad, Malvan, got wet with rain | देवगड, मालवणला पावसाने झोडपले

देवगड, मालवणला पावसाने झोडपले

googlenewsNext

मालवण/देवगड : सिंधुदुर्ग किनारपट्टीसह संपूर्ण जिल्ह्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यात कोसळल्या. त्यानंतर उशिराने दाखल झालेल्या पावसाची बुधवारी ९१.६७ मिलिमीटरची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ७३३.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. देवगड तालुक्यात सर्वाधिक २५२ मिलिमीटर पाऊस कोसळला, तर मालवण तालुक्यात १४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, समुद्र खवळलेल्या स्थितीत असून, देवगड तालुक्यात गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: देवगडला झोडपून काढले. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. भात पेरणीनंतर लावणीच्या प्रतीक्षेत असलेला बळिराजा सुखावला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, दूरध्वनी व विद्युत पोल काही गावांमध्ये पडल्यामुळे काही तास विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे.
मंगळवारी व बुधवारी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता मालवण तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ९०५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर सावंतवाडीत सर्वाधिक कमी ४१२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत दिवसभरात दोडामार्ग तालुक्यात ८७ मिमी , सावंतवाडी ३८, वेंगुर्ले ६९.४०, कुडाळ ४२, मालवण १४९, कणकवली ६१, देवगड २५२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यात १ ते २२ जूनपर्यंत ५१८.२७ मिमीसह ४१४६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यंदा भात लागवडीसाठी ६८ हजार क्षेत्राचे उद्दिष्ट आहे; पण दरवर्षी बदलत्या हवामान पावसाच्या लहरीपणामुळे उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे चित्र आहे. पावसाच्या लहरीपणामुळे भात लागवड क्षेत्र कमी होत आहे. पावसासोबत शेती कामासाठी मजुरांची वानवा जाणवत आहे. (प्रतिनिधी)

वीजपुरवठा खंडित
देवगड तालुक्यात मंगळवारी दुपारी मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता.
यामुळे तालुक्यातील पूरळ, गिर्ये, वाघोटण, सौंदाळे, फणसगाव, आदी गावांमधील वीज खांब पडून या गावांमधील काही वाड्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता.

Web Title: Devgad, Malvan, got wet with rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.