देवगड तालुका पर्यटनात अग्रेसर ठरेल

By admin | Published: May 11, 2017 11:34 PM2017-05-11T23:34:08+5:302017-05-11T23:34:08+5:30

देवगड तालुका पर्यटनात अग्रेसर ठरेल

Devgad Taluka will be the frontrunner in tourism | देवगड तालुका पर्यटनात अग्रेसर ठरेल

देवगड तालुका पर्यटनात अग्रेसर ठरेल

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
देवगड : कोकणच्या पर्यटनात मानाचा तुरा रोवणारे कोकणातील पहिले वॅक्स म्युझियम देवगड येथे सुरु झाले आहे. आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प होऊ घातले असून या प्रकल्पामुळेच देवगड तालुका पर्यटनामध्ये सर्वात प्रगत ठरेल. असा आशावाद माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे व्यक्त केला.
जामसंडे सातपायरी येथे ‘साईमा हेरिटेज’मध्ये उभारण्यात आलेल्या वॅक्स म्युझियमचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर, अभिनेत्री रिंकू राजगुरू, म्युझियमचे संचालक सुनील कंडलूर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, जागा मालक फहीम शेख, तालुकाध्यक्ष संदीप साटम, डॉ. अमोल तेली, उपनगराध्यक्ष योगेश चांदोसकर, जिल्हा बॅँक अध्यक्ष सतीश सावंत, प्रकाश राणे, अ‍ॅड. अविनाश माणगांवकर, बाळ खडपे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, या वॅक्स म्युझियममध्ये महात्मा गांधी, इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच कलाकारांचे पुतळे आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तर जागतिक स्तरावरील कर्तृत्ववान महिला होत्या. त्यांच्यातील एक तरी गुण माझ्यात येईल काय? असा विचार करून या कलेकडे पहा. या कर्तृत्ववान व्यक्तींच्या यशाचा तुमच्या जीवनात पाठलाग करा. कंडलूर यांच्या कलेतून हुबेहूब व्यक्तीमत्वांच्या कर्तृत्वाचा बोध आत्मसात करा. देशात महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जाते. भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना भविष्यात अमेरिका, चीन यांच्याप्रमाणे भारत ही महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या या महासत्तेकडे जाणाऱ्या वाटचालीत तुमचे योगदान द्या असे आवाहन राणे यांनी केले.
आमदार राणे म्हणाले, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. देवगड तालुक्यात चांगली पर्यटन स्थळे आहेत. मात्र, देवगड हा दुर्गम भाग समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
देवगडकडे कोण व कशासाठी जाणार? असे समजले जात होते. मात्र, देवगडची दुर्गम ही ओळख पुसून टाकण्यासाठी, देवगडात पर्यटक येण्याकरीता दहा कारणे निर्माण करणार आहे. त्यातील पहिला भाग वॅक्स म्युझियम, गोल्डी मिनी थिएटर, लहान मुलांसाठी फोर डी हॉरर शो, स्कूबा डायव्हिंग असे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविणार आहे.
आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या सुचनेनंतर या म्युझियममध्ये देवगडचे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचाही पुतळा लवकरच साकारण्यात येणार असून त्याचबरोबर नारायण राणे, नीलेश राणे, नीतेश राणे यांचेही पुतळे उभारण्यात येणार आहेत. निलेश राणे म्हणाले, प्रत्यक्षात संकल्पना राबवून यशस्वी करून दाखविणारा एकच आमदार आहे ते म्हणजे नीतेश राणे. त्यांच्या संकल्पनांना साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अभिनेता आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांनी आपल्या मनोगतात कोकणात यायची संधी मिळाली. कोकणामध्ये भरभरुन प्रेम करणारी माणसे आहेत. असे सांगून त्यांनी रसिकांचे ऋण व्यक्त केले. खासदार नीलेश राणे, दत्ता सामंत, कंडलूर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमानिमित्त खास आकर्षण म्हणून उपस्थित असलेल्या सैराटफेम जोडी आकाश ठोसर व रिंकू राजगुरू या कलाकारांचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तोंड भरून कौतुक केले. सूत्रसंचालन डॉ. मिलिंद कुळकर्णी यांनी केले. प्रास्ताविक साळसकर यांनी केले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर्ची, परशाचे ढोलताशांच्या गजरात स्वागत
सैराट फेम आर्ची, परश्याची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहत्यांनी महामार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. व्यासपीठावर मान्यवरांचा सत्कार सोहळा सुरू असताना एका शांत क्षणी एका चाहत्याने ‘ए परश्या’ अशी हाक मारली आणि रिंकूने आकाशकडे पाहत केलेले स्मित चाहत्यांनी कॅच -अप केले. यावेळी मोठ्या प्रमाणात युवक व युवतींनी गर्दी करत छबी टिपण्याचा प्रयत्न केला.
ढोलताशांच्या गजरात रिंकू-आकाशचे स्वागत झाले. तर लहान मुलांसह युवक-युवतींनी त्यांची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी व्यासपीठासमोर जणू घेरावच घातला. अखेर सुरक्षा रक्षकांनी ही गर्दी पांगवत दुरून मोबाईल फोटो घेण्याची विनंती चाहत्यांना केली.

Web Title: Devgad Taluka will be the frontrunner in tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.