वायंगणी गावाची आज देवपळण

By Admin | Published: March 13, 2016 10:45 PM2016-03-13T22:45:29+5:302016-03-14T00:23:51+5:30

शेकडो वर्षांची परंपरा : तीन दिवस, तीन रात्रीसाठी गाव वेशीबाहेर

Devplan today in Vyangani village | वायंगणी गावाची आज देवपळण

वायंगणी गावाची आज देवपळण

googlenewsNext

मालवण : तालुक्यातील वायंगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाची दर तीन वर्षांनी होणारी देवपळण सोमवार १४ मार्चपासून सुरु होत आहे. ही देवपळण १६ मार्चपर्यंत अशी तीन दिवस आणि तीन रात्री असणार आहे. तीन दिवसाच्या कालावधीत सर्व गावकरीही तीन दिवस वेशीबाहेर थांबणार आहेत. गुरुवार १७ रोजी देवाला प्रसाद लावून गावात परतण्यासाठी कौल घेतला जाणार आहे. आज पहाटे देव वेशीबाहेर चिंदर सडेवाडी येथे जाणार असून दुपारी २ वाजेपर्यंत अख्खे गावही सुनेसुने होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटनात कात टाकली असली तरी येथील लोक श्रद्धेच्या प्रतिक असलेल्या रूढी-परंपरात खंड पडू देत नाही. गावपळण आणि देवपळण ही एक अशीच परंपरा आहे की जी गावाचा सांभाळ करणाऱ्या ग्रामस्थांचा नवचैतन्य देणारी, उत्साह वाढविणारी असते. मालवण तालुक्यात प्रामुख्याने आचरा व चिंदर गावची गावपळण होते. अशीच एक आणखीन देवपळण एक प्रथा तालुक्यातील वायंगणी गावात शेकडो वर्षे सुरु आहे. गावात शांतता, एकी नांदावी तसेच गावकरी मंडळी गुण्यागोविंदाने नांदावेत या उद्दात हेतूने देवपळण केली जाते. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नसून प्रत्येक गावकऱ्याला स्फूर्ती देणारा तो क्षण असतो, असे गावकरी सांगतात.
मालवण - आचरा मार्गावरील वायंगणी गाव वसलेले आहे. देवपळणीच्या कालावधीत गावाच्या सर्व वेशीवर गावकऱ्यांचा एकीचा गजबजाट असतो. कालावल पुलाखाली किनाऱ्यालगत बांधण्यात येणाऱ्या राहुट्या लक्षवेधी ठरतात. विशेषत: रात्रीच्या मंद प्रकाशात लिकलिकणारा उजेड आल्हाददायक असतो.
ग्रामस्थ तीन दिवसांसाठी पुरेल एवढा धान्यसाठा व अन्य साहित्य गोळा करतात. माणसांबरोबर पाळीव प्राण्यांनाही आपल्या सोबतीला आणले जाते. देवपळणीबाबत पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणेसह सर्व प्रशासकीय यंत्रणाही कळविण्यात येते.(प्रतिनिधी)


१७ रोजी परतीचा कौल
श्री देव रवळनाथाची डाळपस्वारी झाल्यावर देव देवपळणीचा कौल देतो. त्यानुसार देवपळणीचा दिवस निश्चित केला जातो. गावकऱ्यांसाठी उत्सवासारखा असणारा सण 'याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी चाकरमानीही गावात दाखल होतात. तीन दिवसीय देवपळण उत्सवात गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात. साधारणपणे १८०० लोकवस्ती असलेले वायंगणी गाव देवपळणीच्या तीन दिवासात वेशी बाहेर अथांग आभाळाच्या छताखाली नांदतात. १४ पासून सुरु होणाऱ्या या देवपळणीचा परतीचा कौल १७ मार्च रोजी सकाळच्या सत्रात होणार आहे.


गावकरी देवाच्या सहवासात
देवपळणीत देव रवळनाथ चिंदर सडेवाडी-गोसावीवाडी येथे वास्तव्यास जातो. त्याठिकाणी असलेल्या घुमटीत देवाचे श्रीफळ ठेवून त्याची पूजा-अर्चा केली जाते. यावेळी मात्र गावातील एकही मंदिरात पूजा केली जात नाही. त्यामुळे देवांच्या सान्निध्यात राहण्याचा ग्रामस्थांचा मानस असतो. गावातील जास्तीत जास्त गावकरी देवाच्या सहवासात तीन दिवस, तीन रात्री घालवितात. झोपडीवजा किंवा राहुट्या उभ्या करून निसर्गाच्या कुशीत ग्रामस्थ वास्तव्य करतात. त्याठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात गावकऱ्यांमुळे अधिक रंग येतो.

Web Title: Devplan today in Vyangani village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.