धनगर कुटुंंबीयांना मिळाली वीजजोडणी
By admin | Published: October 5, 2015 10:09 PM2015-10-05T22:09:31+5:302015-10-06T00:36:04+5:30
सावंतवाडी तालुका : तीस वर्षानंतर घरात पडला प्रकाश
कसई दोडामार्ग : गेली तीस वर्षे उजेडाच्या शोधात असलेल्या वझरे कोळगीरवाडीतील धनगर कुटुंंबियांच्या घरात सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई - शाखा दोडामार्गचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वीजजोडणी देण्यात आली. त्यामुळे या कुटुंबियांच्या घरात प्रकाश पडला.
धनगर वस्ती म्हटली की, बहुतांशी ठिकाणी या समाजाला ना जमीन, ना पाणी, ना वाट, ना रस्ता. या सर्व प्राथमिक गरजांपासून वंचित राहणारा घटक अशीच या समाजाची ओळख. मग ती तालुक्यातील कळणेची धनगर वस्ती असो वा आडाळीची धनगर वस्ती. अशाचप्रकारे गेली तीस वर्षे वीज जोडणीपासून वंचित राहिलेले वझरे कोळगीरवाडीतील आशा गवळी कुटुंब. या कुटुंंबाला आॅक्टोबर २०१४ मध्ये घरगुती वीज प्रकरण मंजूर झाले. परंतु, आॅक्टोबर २०१५ आले तरी त्यांच्या घरात वीजजोडणी देण्यात आली नव्हती.
सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई शाखा - दोडामार्गच्या पदाधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागाशी त्यांनी त्वरित संपर्क साधला असता आज करतो, उद्या करतो अशी उत्तरे संंबंधित कंपनीच्या ठेकेदाराकडून मिळू लागली. शेवटी मंडळाचा हिसका संबंधित कंपनीला मिळताच गेली तीस वर्षे उजेडाच्या प्रतीक्षेत असलेल्या आशा गवळी कुटुंबियांच्या घरी वीजजोडणी देण्यात आली.
याप्रश्नी वर्षभर सतत पाठपुरावा करणारे मंडळाचे तालुकाध्यक्ष सखाराम झोरे, उपाध्यक्ष भैरू वरक, सचिव चिन्मय पटकारे, खजिनदार महेश काळे, संतोष पटकारे, लक्ष्मण गावडे, जनार्दन गावडे, गंगाराम काळे, विठू बोडेकर, सिध्देश पटकारे, रमेश बुटे, रमेश शेळके, संदेश वरक, अनंत ताटे, लक्ष्मण वरक, ज्ञानेश्वर झोरे, गंगाराम कोळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल मुंबई मंडळाचे अध्यक्ष धाकू डोईफोडे, सचिव नवल गावडे यांनी तालुका शाखेचे अभिनंदन केले. तर आशा गवळी कुटुंबाला वीजजोडणीसाठी जमीनमालक रामा हरवळकर यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
धनगर समाजोन्नती मंडळाच्या पाठपुराव्यामुळे मिळाली वीजजोडणी.
गवळी कुटुंबाला आॅक्टोबर २०१४मध्ये घरगुती वीजप्रकरण मंजूर.
गेली तीस वर्षे गवळी कुटुंबिय होते उजेडाच्या प्रतीक्षेत.
महावितरण कंपनीकडून केली जात होती चालढकल.
गवळी कुटुंबियांनी मानले धनगर समाजोन्नती मंडळाचे आभार.