धनगरवाड्या आजही उपेक्षितच
By admin | Published: January 10, 2016 11:40 PM2016-01-10T23:40:40+5:302016-01-11T00:34:43+5:30
खेड तालुका : पालकमंत्र्यांसह आमदारांकडून पदरी निराशा; संतप्त भावना
खेड : खेड तालुक्यातील धनगर समाजाची पुन्हा एकदा निराशा झाली आहे़ तालुक्यातील ४० धनगरवाड्यांपैकी एकाही धनगरवाडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जिल्हा नियोजनातून निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. आमदारांनीही दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे़ आता न्यायासाठी जायचे कोठे? असा सवाल धनगर समाजातील लोक उपस्थित करीत आहेत़ येण्या-जाण्याच्या रस्त्याची आता पार दुरवस्था झाली असून, रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे़ पालकमंत्र्यासह आमदारांनीही तालुक्यातील धनगर समाजाची उपेक्षा केल्याने हा समाज आता पोरका झाला आहे़ धनगर समाज आजही विकासापासून वंचित असून, याकामी आता जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली आहे़
खेड तालुक्यातील ४० धनगरवाड्यांमध्ये बेताचे रस्ते आहेत़ हे रस्ते रामदास कदम आमदार असताना करण्यात आले आहेत. वीजपुरवठा देखील त्यांच्याच काळात झाला आहे़ मात्र, आता त्यावर २५ वर्षे उलटून गेली आहेत़ त्यामुळे हे रस्ते पुरते खराब झाले आहेत़ निधीअभावी या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांचेशी चर्चा केली असता त्यांनी पालकमंत्री आणि आमदार संजय कदम यांच्याकडे धनगर वाड्यांतील रस्त्यांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत, असे सांगितले.
मात्र, याकामी कोणीही लक्ष दिले नसल्याची माहिती त्यांनी दिली. पालकमंत्र्यांकडून धनगरवाड्यातील १५ रस्त्यांचे डांबरीकरणाचे प्रस्ताव जिल्हा नियोजनाकडे देण्यात आले आहेत़ मात्र, जिल्हा नियोजनमधून यापैकी एकाही रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली नाही़ आमदार संजय कदम यांच्याकडेही या रस्त्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे.
मात्र, त्यांनीही या धनगरवाड्यांतील रस्त्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलेले नाही़ एकूणच धनगर वाड्यांतील रस्त्यांची परिस्थिती गंभीर असून, यामुळे धनगरवाड्यातील नागरिकांना आता पुन्हा डोंगरदऱ्यातून उतरावे लागणार आहे़ (प्रतिनिधी)
दुर्लक्ष होण्याची भीती : जिल्हा नियोजनमधून निधीचा ठेंगा
जिल्हा नियोजनमधून करोडो रूपये खर्च करण्यात आले आहेत़ मात्र, धनगरवाड्यांतील रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध केलेला नाही़ आमदारांनीही या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. धनगर समाजाची यापेक्षा कुचेष्टा ती काय असू शकते, अशा शब्दात समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत या तथाकथित राजकारणाने समाज पुन्हा वाऱ्यावर येणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. रामदास कदम आमदार असताना त्यांच्या काळात याच धनगर समाजासाठी रस्ते, पाणी आणि वीज आदी सुविधा देऊन समाजाला नवसंजीवनी देण्यात आली होती़ मात्र, आता येथील वाड्यांवर रस्ते आणि पाणीपुरवठा यांची वानवा आहे़ +
नियोजनाच्या कामात असमतोलाची भावना
पालकमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडले असले तरी जिल्हा नियोजनाच्या निधीचे वाटप करताना आमदारांनी किंवा काही लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा नियोजनच्या एकूणच कामामध्ये असमतोल राहिल्याचे या समाजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पूर्वापार डोंगराळ भागात राहून आपली उपजीविका करणारा हा समाज आता विकासापासून वंचित आहे़ राज्य सरकारने अनेक योजना करूनही या समाजाला उपेक्षित राहावे लागत आहे. याकामी आता जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालण्याची मागणी या समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे़