धर्मवादामुळे देशाची लोकशाही धोक्यात : श्रीरंजन आवटे , सावंतवाडीत प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 05:21 PM2018-01-20T17:21:19+5:302018-01-20T17:26:04+5:30
देशात निर्माण होत असलेल्या विविध धर्मवादांमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यात लोकशाही म्हणजेच बहुसंख्यांक राष्ट्र अशी धारणा लोकांत निर्माण झाल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजविण्यात समस्या निर्माण होत असल्याचे मत पुणे येथील श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी : देशात निर्माण होत असलेल्या विविध धर्मवादांमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यात लोकशाही म्हणजेच बहुसंख्यांक राष्ट्र अशी धारणा लोकांत निर्माण झाल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजविण्यात समस्या निर्माण होत असल्याचे मत पुणे येथील श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले.
येथील श्रीराम वाचन मंदिर आयोजित देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पात धर्मनिरपेक्षतेवरील आव्हाने या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, सदस्य प्रसाद पावसकर उपस्थित होते.
यावेळी आवटे म्हणाले, बहुसंख्य वाद म्हणजे लोकशाही या विचारात आपण आहोत. यातूनच जमातवाद उदयास येत आहे आणि ही गोष्ट भारतासारख्या देशाच्या लोकशाहीस धोकादायक आहे.
पूर्वीही जमातवादाने भयंकर रुप घेतल्या गेलेल्या अनेक घटना आहेत. आणि त्याला सर्वसामान्य माणून बळी पडला आहे. देशात जेवढी हत्याकांडे व दंगली झाल्या, त्यानंतरचा काळ निवडणुकीचाच असायचा. त्यामुळे यामागे निवडणुकीची पार्श्वभूमीच दिसून येते.
या लोकशाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश भारताची लोकशाही धोक्यात असल्याचे सांगतात, रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरलाच नोटाबंदी होणार आहे हे माहीत नसते, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, या सर्व बाबी लोकशाहीच्या प्रश्नावर प्रत्येक माणसाला विचारात पाडतात.
हा देश हुकूमशाहीकडे जाईल अशी आज भीती निर्माण झाली आहे. हा देश अशांच्या हाती आला आहे ज्यांना सेल्फीशिवाय काही कळत नाही. पटेल आंदोलन, गुजरात आंदोलन, कोरेगाव-भीमा हे जाणीवपूर्वक निर्माण करुन समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहेत.
आज मुलभूत प्रश्नांचा विचार करता राजसंस्था घराघरात येऊन घुसली आहे. अनेक चुकीच्या धारणा निर्माण करून हिंदुत्ववाद व उदारमतवाद यात प्रचंड तेढ निर्माण करते आहे. विचारांचा आगडोंब निर्माण होत आहे. या प्रत्येक विकाराला उत्तर सलोखा व प्रेमाने देऊ शेकतो, असे आवटे यावेळी म्हणाले.