धुत्रोलीतील जमीन परस्पर विकली...
By admin | Published: April 21, 2015 11:34 PM2015-04-21T23:34:38+5:302015-04-22T00:25:40+5:30
देव्हारेत खळबळ : कोटींची फसवणूक
देव्हारे : मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील एकच जागा दोन मालकांनी दोघांना विकल्याने खळबळ माजली आहे. या फसवणुकीच्या प्रकारामुळे संपूर्ण तालुका हादरला आहे. जमिनीच्या भरमसाठ वाढत जाणाऱ्या किंमतींच्या हव्यासापोटी हा प्रकार घडत असल्याचे पुढे येत आहे.
नायणे येथील रोहित दळवी या व्यक्तीने २०११ मधे येथे चार जागा नऊ लाख रूपयांना खरेदी करण्यासाठी नऊ लाख रूपये दिले होते. यापैकी एजंट व जागा मालक यांना नऊ लाख रूपये चेकने व रोखीने दिले आहेत़ मात्र, रक्कम घेऊनही जागा मालक व दलाल सदरच्या जागा खरेदीखत करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यापैकी दलाल असलेली व्यक्ती ही राजकीय क्षेत्रात काम करत असल्याचे एैकावयास मिळत आहे. आपली राजकीय ताकद वापरून, सदरच्या जागा घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे करण्यास टाळाटाळ करीत आहे. ही जागा मालक व दलालांनी नायणे येथील व्यक्तीच्या नावे जागा न करता, त्या जागा दुसऱ्याच व्यक्तीला विकून मोकळे झाले आहेत. ही बाब नायणे येथील खरेदीदाराच्या लक्षात येताच, त्यांनी सदर व्यक्तींकडे व दलालाकडे संपर्क साधून आपण दिलेली रक्कम परत मागितली आहे. मात्र, धुत्रोली येथील या कंपनीने पैसे परत करण्यास नकार दिला असल्याचे समजते.
आपले झालेले नऊ लाखाचे नुकसान पाहता, नायणे येथील जागा खरेदी करणारी व्यक्ती हा विषय आता तंटामुक्त कमिटीकडे मांडून, न्याय मागितला आहे. जर तंटामुक्त समितीकडे योग्य न्याय मिळाला नाही, तर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती रोहित दळवी यानी दिली. यापूर्वीही असे अनेक फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. काही दिवसापूर्वी कुंबळे येथील जागेमधे डॉक्टरांची फसवणूक करण्यात आली होती.
या प्रकारामुळे जागा खरेदी करताना मोठी खबरदारी घेण्याची वेळ आली असल्याचे चित्र दिसत आहे. ़ (वार्ताहर)
सत्य समोर येण्याची गरज...
दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण या भागात जमीन खरेदी-विक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असून याबाबत काही दलालांना हाताशी धरून मालक व काही राजकीय नेते आपले उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. केळशी, उटूंबर, बाणकोट, वेसवी, मुरूड, धुत्रोली या भागात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या विषयात सत्य पुढे येईल, असे स्पष्ट होत आहे.