जिल्ह्यात १00 मुलांना अतिसार
By Admin | Published: August 12, 2015 08:42 PM2015-08-12T20:42:43+5:302015-08-12T20:42:43+5:30
अतिसार नियंत्रण पंधरवडा : ३४ हजार मुलांना ‘ओआरएस’चे वितरण
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ जुलै ते ८ आॅगस्ट या कालावधीत ‘अतिसार नियंत्रण पंधरवडा’ अभियान राबवून ० ते ६ वयोगटांतील ३७ हजार ८५६ मुलांपैकी ३४ हजार ७१२ मुलांना ओआरएस पाकिटाचे वितरण करण्यात आले. तर यामध्ये १०० मुलांना अतिसार झाल्याची माहिती देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील बालकांमध्ये होणाऱ्या अतिसार या आजारावर नियंत्रण ठेवण्याच्यादृष्टीने २८ जुलै ते ८ आॅगस्ट या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा साजरा करण्यात आला. यामध्ये ० ते ६ वयोगटांतील ३७ हजार ८५६ मुलांपैकी ३४ हजार ७१२ मुलांना ओआरएसचे पाकीट वितरित करण्यात आले. तसेच यामध्ये १०० मुले ही अतिसार या आजाराने पीडित असल्याचे निष्पन्न झाले. या १०० मुलांना १४ दिवस ओआरएसचे पाकीट देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा आणण्यात आली. प्रत्येक घराला भेट देऊन ओआरएसचे द्रावण कसे करावे, याबाबतची माहिती देण्यात आली.
हिरकणी कक्षासाठी प्रत्येकी पाच हजार
प्रत्येक मातेला आपल्या मुलाला समाधानाने दूध पाजता यावे यासाठी जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हिरकणी कक्ष कार्यान्वित केले आहेत. यामध्ये सर्व सोयीसुविधा व अद्ययावतीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून प्रत्येक कक्षासाठी पालकमंत्र्यांनी पाच हजार रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
झोळीचा वापर टाळावा
मातेच्या कुशीमध्ये ऊब लहान मुलांसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे बाळाला आईच्या कुशीत झोपविल्यास बाळाला आवश्यक असे हे तापमान मिळते व जंतुसंसर्ग कमी होतो. यासाठी पाळणा व झोळी पद्धतीचा वापर टाळावा, असे आवाहनही डॉ. साळे यांनी केले आहे. पंधरवड्याच्यानिमित्त जिल्ह्यातील २८८९ स्तनदा मातांना स्तनपानाबाबतचे कौशल्य, स्तनपान करण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती डॉ. योगेश साळे यांनी दिली.