दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण
By admin | Published: May 15, 2016 12:21 AM2016-05-15T00:21:41+5:302016-05-15T00:21:41+5:30
महामार्गावर पाण्यासाठी आज रास्ता-रोकोचा इशारा
नांदगाव : कणकवली तालुक्यातील साळिस्ते ग्रामपंचायतीने पुरवठा केलेल्या दूषित पाण्यामुळे सुमारे ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाल्याची घटना घडली आहे. साळिस्ते गावातील ताम्हणकरवाडी, गुरववाडी व रांबाडेवाडीत या दूषित पाण्याची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून गटविकास अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून गेले चार दिवस ग्रामपंचायतीने संपूर्णपणे पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा शनिवारी उद्रेक झाला. पाण्याविना अतोनात हाल होत असलेल्या ताम्हणकरवाडी, गुरववाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सरपंच सुगंधा मेस्त्री यांना चांगलेच धारेवर धरत पाण्याची त्वरीत सोय करा अन्यथा रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर साळिस्ते येथे रिकामी भांडी घेऊन मुलाबाळांसह रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साळिस्ते ग्रामपंचायतीची रामेश्वर मंदिरनजीक असलेली सार्वजनिक विहिरीतून गेले कित्येक वर्षे गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यांत या विहिरींचे पाणी आटते. त्यामुळे ग्रामपंचायत पर्यायी पाणीपुरवठा मार्ग शोधून पाणीपुरवठा करते. यावर्षीही लिंगायतवाडीमधील ग्रामपंचायतीच्या कच्च्या विहिरीमधून रामेश्वर मंदिरानजीक असलेल्या विहिरीत पाणी सिफ्ट करून गावाला पाणीपुरवठा सुरु करण्यात आला होता.
दरम्यान, गुरववाडी, ताम्हणकरवाडीमधील ग्रामस्थांना १२ मे रोजी हे पाणी पिल्याने उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. काहींना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना लोरेतील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १३ मे रोजी दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याने संख्या वाढत गेली. शनिवारीही चार रुग्णांना प्राथमिक आरोग्यकेंद्र खारेपाटण येथे दाखल करण्यात आल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले. दूषित झालेल्या पाण्यामुळे साथ पसरल्याने खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने संपूर्ण साळिस्ते गाव पिंजून काढत खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मंडावरे यांच्यासह संपूर्ण कर्मचारीवर्गांनी पाण्याचे नमुने घेऊन गावातील प्रत्येक घराला भेट देत मेडिक्लोरच्या बाटल्यांचे वाटप करून पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)
चार दिवसांत बाधित झालेले रुग्ण
अमित ताम्हणकर (वय २०, ताम्हणकरवाडी), दीपा ताम्हणकर (वय ३०, ताम्हणकरवाडी), तुकाराम गुरव (गुरववाडी, वय ७१) हे रुग्ण प्राथमिक आरोग्यकेंद्र खारेपाटण येथे उपचार घेत असून चार दिवसांपूवी बाधित झालेल्या रुग्णांमध्ये रविंद्र नारकर (वय ५२), संजय ताम्हणकर (वय ३०), अजय ताम्हणकर (वय २६), सुनिल ताम्हणकर (वय ४२), आदित्य ताम्हणकर (वय १४), रविंद्र ताम्हणकर (वय ५२), सुंदराबाई ताम्हणकर (वय ७०), अरुण ताम्हणकर (वय ५५), शुभांगी ताम्हणकर (वय ६७), शशिकांत वारस्कर (वय ६०) यांच्यासह अनेक रुग्ण दाखल झाले होते.
आरोग्य विभागाकडून मेडिक्लोरचे वाटप
दूषित पाण्यामुळे अतिसाराची साथ पसरल्याने प्राथमिक आरोग्यकेंद्र खारेपाटणचे आरोग्य कर्मचारी प्रत्येक घराला भेट देत असून पाण्याचे नमुने घेऊन प्रत्येक घरामध्ये एक मेडिक्लोरच्या बाटलीचे वाटप करीत आहेत.